अवघ्या नऊ तासांत वीस हजारांहून अधिक पुणेकरांनी रविवारी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. विशेष म्हणजे यातील पाच हजारांहून अधिक युवक-युवतींनी प्रथमच रक्तदान केले.
आर. एम. धारिवाल फाऊंडेशनतर्फे रविवारी रक्तदान महाअभियान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री प्रदीप जैन आदित्य, संस्थेचे अध्यक्ष रसिकलाल धारिवाल, उपाध्यक्ष शोभा धारिवाल यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, योगाचार्य बी. के. अय्यंगार या वेळी उपस्थित होते.
प्रदीप जैन यांनी सहपरिवार रक्तदान केले. गुलाबराव पोळ यांनीही शिबिरात रक्तदान केले. १५८ वेळा रक्तदान करणारे रक्तदाते किशोर गिरमे, ११० वेळा रक्तदान करणारे राम बांगड हे देखील रक्तदानासाठी उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत शहरात एकाच दिवशी १७ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. शिवाजीनगर, खडकी बाजार, वडगाव बुद्रुक, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, डेक्कन जिमखाना, कोथरूड, येरवडा, कोंढवा, कोंढवा बुद्रुक, नऱ्हे, आंबेगाव बुद्रुक, वारजे, लष्कर भाग तसेच चिंचवड गाव येथेही रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाचे शतक आणि अर्धशतक पार करणाऱ्या रक्तदात्यांबरोबरच प्रथमच रक्तदान करणाऱ्यांनीही या अभियानास भरभरून प्रतिसाद दिला. काही शिबिरांमध्ये रक्तदात्यांचा ओघ सहभागी रक्तपेढय़ांच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्यामुळे अनेक इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान न करताच परतावे लागल्याची माहिती संस्थेने दिली.