वीज बिल भरणा केंद्राची जमा झालेली रक्कम घेऊन जात असताना रस्त्यात रोखपालाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याच मोटारचालकाने २५ लाख रुपयांची रकमेची बॅग चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री येरवडा येथे घडला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
बाबुराम भैयाराम अगरवाल (वय ५१, रा. विजय कारगील सोसायटी, विमाननगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून रमेश चौहान (रा. बोपोडी) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील महावितरणाच्या बारा ठिकाणचा वीज बिल भरणा केंद्राचा अगरवाल यांनी ठेका घेतला आहे. या ठिकाणाहून अगरवाल हे वीज बिलाची रक्कम गोळा करून महावितरणकडे जमा करतात. या बारा वीज भरणा केंद्रातील शुक्रवारी दिवसभरात जमा झालेली रक्कम रोखपाल राजू गायकवाड आणि मोटारीचा चालक चौहान हे मोटारीतून मालकाकडे घेऊन जात होते. रात्री साडेनऊच्या सुमारास येरवडय़ातील जाईजुई शासकीय वसाहतीजवळ आल्यानंतर चालक चौहान याने मोटारीच्या दोन्ही बाजूच्या काचा खाली करत मोटार थांबविली. त्या ठिकाणी आरोपीच्या एक साथीदाराने गायकवाड यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. चौहान आरोपीने कारचा दरवाजा उघडून सीटवर ठेवलेली २४ लाख ८५ हजार रुपयांची रोख आणि धनादेशाची रक्कम असलेली बॅग पळवून नेली. चौहान मूळचा राजस्थान येथील असून त्याने बॅग पळविलेल्या पद्धतीवरून हा पूर्वनियोजित कट रचला होता. त्याचा व त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून चौहान हा अगरवाल यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. त्याच्याबद्दल अगरवाल यांच्याकडे अधिक काहीच माहिती नाही, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक एस. डुबल यांनी दिली.