scorecardresearch

‘प्रकाशवाटा’च्या पंचविसाव्या आवृत्तीचे प्रकाशन

डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ आत्मकथनाच्या २५ व्या आवृत्तीचे आणि ‘रानमित्र’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अवचट यांच्या हस्ते करण्यात आले.

‘प्रकाशवाटा’च्या पंचविसाव्या आवृत्तीचे प्रकाशन

‘बाबा आमटे यांचे संस्कार, शिस्त, साधनाताईंचा आधार, वैद्यकीय शिक्षण घेताना भेटलेला सहचर, नंतर हेमलकसा येथे वसवलेले विश्व आणि या प्रवासात रानमित्रांनी लावलेला लळा.’ अशी अद्भुत ‘प्रकाशवाट’ आमटे दांपत्याच्या आणि डॉ. अनिल अवचट यांच्या रंगलेल्या गप्पांमधून रविवारी उलगडली.
समकालीन प्रकाशनातर्फे डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ आत्मकथनाच्या २५ व्या आवृत्तीचे आणि ‘रानमित्र’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी एम. डी. रामटेके यांनी लिहिलेल्या ‘आम्ही माडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. मंदाकिनी आमटे, समकालीन प्रकाशनाचे आनंद अवधानी, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या वेळी आमटे दांपत्याच्या वाटचालीतील अनेक किस्से ऐकताना उपस्थित भारावून गेले. या वेळी डॉ. आमटे म्हणाले, ‘‘बाबा द्रष्टे होते आणि म्हणूनच आमचे वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला भामरागडला सहलीसाठी नेले. त्यातूनच हेमलकसामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली. संस्थेचा हिशोब कसा असावा, आर्थिक व्यवहार कसे असावेत याची शिस्त बाबांनी लावली.’’ हेमलकसाच्या प्रकल्पामध्ये भेटलेल्या रानमित्रांबाबत बोलताना डॉ. आमटे म्हणाले, ‘‘प्राण्यांबद्दल काय आवडतं. तर प्राणी प्रश्न विचारत नाहीत. सुरुवातीला सोबतीला एक कुत्रा पाळला आणि आता बिबटय़ापर्यंत. मित्र भेटले आहेत. आदिवासींकडून शिकार झालेल्या प्राण्यांची पिल्ले त्यांनी द्यावीत, असे आवाहन आदिवासींना केले. त्याबद्दल आदिवासींना अन्न दिले आणि यातून प्राण्यांचे अनाथालय उभे राहिले. त्या वेळी या प्राण्यांना जवळ केले नसते, तर त्यांची शिकार झाली असती. प्रकल्पामध्ये काम करताना प्राधान्य हे माणसांना, रुग्णांनाच होते. मात्र, स्वभावाचा विचार केला, तर माणसापेक्षा प्राणी जवळचे वाटतात.’’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2013 at 02:55 IST

संबंधित बातम्या