पुणे शहरासाठी जुलै महिन्यात विशेष ठरला असून, या महिन्यातील ३१ पैकी तब्बल २८ दिवस पावसाचे ठरले आहेत. विशेष म्हणजे १० जुलैपासून १ ऑगस्टपर्यंत गेली सलग २२ दिवस एकही दिवस पावसाचा खंड पडलेला नाही. पावसाची पुण्यावर झालेली इतकी कृपा अपवादात्मक असल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. या सततच्या पावसाने शहरातील खड्डे बुजवण्यासाठीसुद्धा वेळ दिला नाही.
राज्याच्या बऱ्याचशा भागात गेल्या दोन वर्षांत अतिशय अपुरा पाऊस पडला व दुष्काळाचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे पुण्यावरही पावसाची नाराजी होती. त्या तुलनेत यंदाच्या हंगामात पाऊस अपवादात्मक ठरला आहे. जूनमध्ये त्याला सुरुवात झाल्यानंतर त्याने मोजक्याच काही दिवसांची विश्रांती घेतली. तेव्हापासून तो आतापर्यंत सुरूच आहे. पावसाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जुलै महिन्यातील आकडेवारी विक्रमी आहे. या महिन्यात या वर्षी ३१ पैकी २८ दिवस पावसाचे ठरले आहेत. सामान्यत: या महिन्यात असे १३ दिवस असतात. यावरून यंदाचे वर्ष किती जास्त पावसाचे आहे हे स्पष्ट झाले आहे.  त्याचबरोबर जुलैचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या महिन्यात १० ते ३१ तारखेपर्यंत सलग पाऊस पडत आहे. या काळात एकही दिवस कोरडा गेला नाही. जुलै संपल्यानंतर गुरुवारी, १ ऑगस्टलासुद्धा (म्हणजे सलग २२ दिवस) पाऊस कायम होता.
यंदा जून महिन्यातही काहीसे असेच चित्र पाहायला मिळाले. या महिन्यात पावसाचे दिवस केवळ ७ ते ८ इतकेच असतात. मात्र, या वर्षी या महिन्यात तब्बल २० दिवस पावसाचे ठरले आहेत. पुण्यात या वर्षी जून व जुलै महिन्यांत एकूण ४८ दिवस पावसाचे होते. सरासरीनुसार पुण्यात संपूर्ण वर्षांत केवळ ३८ पावसाचे दिवस असतात. ही तुलनासुद्धा या वर्षीच्या पावसाचे वेगळेपण स्पष्ट करते.
पुण्यात ४५३ मिलिमीटर पाऊस
पुणे शहरात गेली दोन महिने पडलेल्या संततधार पावसाची नोंद तब्बल ४५३.५ मिलिमीटर इतकी झाली आहे. या दोन महिन्यांत पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा हा आकडा तब्बल १३२ मिलिमीटरने जास्त आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने त्याची या हंगामात किती नोंद होते याबाबत उत्सुकता आहे, असे पुणे वेधशाळेतील अधिकारी सतीश गावकर यांनी सांगितले.
धरणे काठोकाठ; नदीकाठी इशारा
पुण्याला पाणी पुरवणारी सर्व धरणे गुरुवारी काठोकाठ भरलेली होती. त्यामुळे धरणांच्या क्षेत्रात पडणारे सर्व पाणी नदीतून सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे गुरुवारी खडकवासला धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास त्यात शुक्रवारी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.