उत्तर प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले सुमारे साडेबावन्न लाख रुपये किमतीचे कोकेन अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी दुपारी पकडले. शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळ या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत पुण्यात पकडलेले हे सर्वाधिक किमतीचे कोकेन आहे.
साजीद रणजीत खान (वय ३५), रज्जी लियाकत अन्सारी (वय ३७), इरफान समशुद्दीन खान (वय २७), समसुलहसन कमरुद्दीन सैफी (वय २०, सर्व जण मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातून दोन जण मोठय़ा प्रमाणावर कोकेन पुण्यात घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली. उत्तर प्रदेशातील मथुरा येथून २८ एप्रिलला अर्धा किलो कोकेन घेऊन तीन जण पुण्याकडे निघाले असून, पुण्यात अली सौदागर याला त्याची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहराच्या विविध भागात त्याच दिवसापासून पोलिसांनी सापळा लावला.
बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळील सफारी लॉजच्या समोर दोन मोटारसायकलींवर चार जण संशयीतरीत्या थांबलेले पोलिसांना दिसले. त्यामुळे त्यांना पकडून त्यांची झडती घेतली. त्या वेळी साजीद खान याच्याकडे कोकेन सापडले. या प्रकरणात हशमत अली खान उर्फ मास्टर हा तळेगाव दाभाडे येथून पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.
गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील तांबे, विनोद पाटील, कुणाल माने, भरत जरांडे, राकेश गुजर, विनायक जाधव, वासुदेव पाटील, कृष्णा निढाळकर आदींनी ही कामगिरी केली.
 बेकरीच्या आडोशाने अमली पदार्थाचा व्यवसाय
कोकेनच्या विक्री प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रज्जी अन्सारी व इरफान खान हे दोघे जण १० वर्षांपासून तळेगाव दाभाडे येथे राहण्यात आले होते. तळेगावपासून काही अंतरावर असलेल्या इंदुरी गावामध्ये ते गुडलक नावाची बेकरी चालवित होते. साजीद खान हा कोकेनच्या विक्रीमधील मुख्य सूत्रधार आहे. मथुरावरून पुण्यात आल्यानंतर तो तळेगाव दाभाडे येथे अन्सारी व खान यांच्याकडे गेला होता. त्यांना घेऊन तो कोकेनच्या विक्रीसाठी पुण्यात आला होता. त्यामुळे बेकरीच्या आडोशाने अमली पदार्थाच्या व्यवसायातील सहभाग उघड झाला आहे.