येरवडा कारागृहातून गेल्या दहा वर्षांत संचित रजेवर (पॅरोल) सोडण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५७ कैदी फरार झाले आहेत. फरार झालेल्यांपैकी २५ टक्के कैदी खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्य़ातील आहेत. फरार झालेले कैदी शोधण्यासाठी पोलीस यंत्रणांकडूनही प्राधान्य कमी दिले जात असल्याचे समोर आले आहे. कैद्यांना पॅरोलवर सोडण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे कारागृहाबाहेरील यंत्रणांवर असल्यामुळे आपणाला यामध्ये काही करता येत नाही, अशी माहिती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
येरवडा कारागृहात सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेले आणि शिक्षा झालेले साधारण तीन हजार कैदी आहेत. येरवडा कारागृहाची क्षमता ही साधारण चोवीसशे कैद्यांची असून यामध्ये शिक्षा झालेले बाराशे आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेले अठराशे कैदी आहेत. कारागृहातील शिक्षा झालेल्या कैद्यांना संचित रजा (पॅरोल) आणि अभिवाचन रजा (फलरे) अशा दोन प्रकारे बाहेर सोडले जाते. यातील अभिवाचन रजा हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. काही ठरावीक कालावधीसाठी कैद्यांना ही रजा दिली जाते. या रजा घेऊन बाहेर पडलेले कैदी पळून जाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मात्र, संचित रजेवर सोडण्यासाठी मोठय़ा प्रक्रियेतून जावे लागते. ती प्रक्रिया ही पूर्णपणे बाहेरील यंत्रणांवर अवलंबून आहे. येरवडा कारागृहात गेल्या दहा वर्षांत संचित रजेवर सोडण्यात आलेले ५७ कैदी फरार आहेत. २०१२ मध्ये ३१५ कैद्यांना संचित रजा, तर ३७० कैद्यांना अभिवाचन रजा मंजूर करण्यात आली आहे.
कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कैद्याच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे किंवा त्याच्या घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, अशा वेळी कैदी संचित रजेसाठी अर्ज करू शकतो. संचित रजा देण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्याचा अहवाल, कारागृहातील त्याचा वर्तणूक अहवाल, त्याचे नातेवाईक आजारी असेल तर त्याचा अहवाल हा संबंधित विभागीय आयुक्तांकडे पाठविला जातो. ते पाहून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याला सात ते वीस दिवसांपर्यंत संचित रजा मंजूर केली जाते. या संचित रजेमध्ये वाढ करायची असेल तर पुन्हा ही प्रक्रिया पार पाडावी लागते. संचित रजा देण्याची प्रक्रिया पूर्णपणे बाहेरील यंत्राणांवर अवलंबून असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आलेला पोलिसांचा अहवाल हा ‘मॅनेज’ केलेला असतो. त्याचबरोबर संचित रजेवर गेलेला कैदी पळून गेल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. मात्र, खूपच कमी गुन्ह्य़ांमध्ये कैद्यांचा तपास केला जातो. त्यामुळे संचित रजेवर पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ही रजा देण्याचे अधिकार हे कारागृहाला देण्यात यावेत, असे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.