एप्रिल-मे महिन्यातील सुटीनिमित्त महापालिकेची काही उद्याने दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार शहरातील सहा उद्याने १५ जूनपर्यंत सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत खुली राहणार आहेत.
महापालिकेतर्फे शहरात शंभरहून अधिक उद्याने विकसित करण्यात आली आहेत. या उद्यानांची वेळ सकाळी सहा ते दहा आणि दुपारी चार ते रात्री आठ अशी ठेवण्यात आली आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटय़ा लागल्या असून सुटय़ांमुळे पुण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. अशा काळात सकाळी दहापासून दुपारी चार पर्यंत उद्याने बंद राहात असल्यामुळे विद्यार्थ्यांची तसेच पर्यटकांची गैरसोय होते. त्यामुळे सुटय़ांच्या काळात उद्याने दिवसभर उघडी ठेवावीत, अशी मागणी होत होती.
या मागणीचा विचार करून काही महत्त्वाची उद्याने दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही उद्याने १५ जूनपर्यंत दिवसभर खुली राहतील. खुली राहणारी उद्याने व त्यांच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत. छत्रपती संभाजीमहाराज उद्यान, जंगलीमहाराज रस्ता सकाळी साडेआठ ते रात्री नऊ, याच उद्यानातील मत्स्यालयही या वेळेत खुले असेल. हे उद्यान सुटय़ांच्या हंगामात बुधवारीही खुले राहणार आहे. कै. तात्यासाहेब थोरात उद्यान, कोथरूड, कै. यशवंतराव चव्हाण उद्यान, सहकारनगर, पु. ल. देशपांडे उद्यानातील (सिंहगड रस्ता) पुणे ओकायामा मैत्री उद्यान तसेच याच उद्यानातील मुघल गार्डन टप्पा २ आणि डॉ. राममनोहर लोहिया उद्यान, हडपसर ही सर्व उद्याने सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत खुली राहतील. पेशवे उद्यान सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेत खुले राहील. या काळात पेशवे उद्यान बुधवारीही खुले राहणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी ही उद्याने विशेष व्यवस्था म्हणून दिवसभर खुली राहणार असून उद्यानाच्या वेळेतेच दैनंदिन देखभाल, दुरुस्तीची कामे सुरू राहणार असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्यान अधीक्षक टी. एन. जगताप यांनी केले आहे.