राजभवनातून तीन दिवसांपूर्वी चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याच्या गुन्ह्य़ाचा पोलिसांनी छडा लावून पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावाजवळील माळावरून सातजणांना अटक केली. नंदीबैलाचा खेळ करणारी ही टोळी असून त्यांनी राजभवन येथील चंदनाच्या झाडांची पाहाणी करून ही चोरी केली होती. चोरलेले चंदन विकत घेणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तेरा किलो चंदनाचा ओला लाकडी भाग आणि चार किलो ओली साल, तीन करवत, एक कुऱ्हाड जप्त केली आहे.
हनुमंता यल्लप्पा मोरे (वय ४५, रा. माळेगाव, बारामती), परशुराम हनुमंता मोरे (वय २२), अमोल शिवाजी जाधव (वय २०), किसन रायप्पा मोरे (वय २०), शिवाजी हनुमंता जाधव (वय ३५), विजय लक्ष्मण चौगुले (वय ३०), भैरू रायप्पा मोरे (वय २१, रा. वाळवाणा सुपा, पारनेर, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. यांच्याकडून चंदन खरेदी करणारा हनमंता मारुती धनशेट्टी (रा. सरदवाडी, शिरूर) याला अटक केले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजभवनातून चंदनाची झाडे चोरून नेणारे आरोपी हे पिसर्वेगाव येथील माळावरील पालात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एम. जी. बाळकोटगी यांच्या पथकाने जाऊन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी राजभवन येथून चोरून नेलेले चंदन धनशेट्टी याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करून तेरा किलो चंदनाचा ओला लाकडी भाग आणि चार किलो ओली साल, तीन करवत, एक कुऱ्हाड जप्त केली आहे. आरोपींकडे चौकशी केली असता, या टोळीचा मुख्य आरोपी मोरे याने चोरीच्या दोन दिवस अगोदर मोटारसायकलवरून राजभवनातील चंदनाच्या झाडाची पाहाणी केली होती. झाडाची पान आणि सालीवरून त्याने या ठिकाणी चंदनाची झाडे असल्याचे हेरले. १४ जून रोजी आरोपी मध्यरात्री मोटारसायकवरून आले. राजभवनाच्या गेट क्रमांक तीनच्या बाजूला असलेल्या भिंतीवरून आतमध्ये शिरले. चंदनाची चोरी करून पसार झाले, असे उमाप यांनी सांगितले.
 राजभवनाच्या सुरक्षेचे ऑडिट
राजभवन हे २६ एकर परिसरात पसरले आहे. याला तीन प्रवेशद्वार असून यातील फक्त मुख्य प्रवेशद्वाराजवळच सुरक्षारक्षक ठेवण्यात आला आहे. प्रवेशद्वार क्रमांक तीन जवळची जागा यशदाला देण्यात आलेली आहे. या जागेजवळ भिंतीची उंची कमी असल्यामुळे येथूनच चोरटय़ांनी आत प्रवेश केला. राजभवनात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. राजभवन हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे निवासस्थान असल्यामुळे येथील सुरक्षेचे ऑडिट करण्यात आले आहे. त्याचा अहवाल संबंधितांना पाठविण्यात आला आहे, असे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.