महावितरणच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना उजेडात आला आहे. टाळेबंदीत सर्वकाही बंद अवस्थेत असतानाही भोसरीतील लघुउद्योजकाला कंपनीच्या वीजवापराचे महिन्याचे बिल ८० कोटी रुपये आकारण्यात आले. त्यामुळे संबंधित उद्योजकाचे धाबे दणाणले आहेत. मात्र, लघुउद्योजक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महावितरणकडून चूक मान्य करत सुधारित बिल देण्यात आले.

भोसरीतील साई प्रोफाईल या कंपनीच्या बाबू यांना दरमहा दीड ते दोन लाखापर्यंत विजेचे बिल येते. मात्र, मे २०२० या एकाच महिन्यासाठी त्यांना महावितरणकडून ८० कोटी ५ लाख रुपये विजेचे बिल धाडण्यात आले. टाळेबंदीमुळे कंपन्या बंद होत्या. फारसे काम मिळतही नव्हते. तरीही ८० कोटी बिल आले. मुळातच इतके बिल येण्याचे काहीच कारण नसल्याची खात्री असल्याने बाबू यांनी लघुउद्योग संघटनेकडे धाव घेतली. संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आक्रमक पवित्रा घेत संघटनेने आंदोलनाचा इशाराही दिला. त्यानंतर बिलाची फेरतपासणी करण्यात आली. अखेर, ८४ हजार ९५० रुपये असे सुधारित बिल देऊन प्रकरण वाढू न देण्याची खबरदारी महावितरणकडून घेण्यात आली.

महावितरणकडून प्रत्यक्ष वीजमीटर पाहून बिलाची आकराणी केली जात नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या गंभीर चुका होतात. यापुढील काळात तरी महावितरणने आपला कारभार सुधारावा,अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

या कंपनीला अवास्तव बिल पाठवण्यावरून संबंधित विभागाला जाब विचारला आहे. तीन महिने रीडिंग बंद होते. नव्याने रीडिंग घेत असताना गफलत झाली. नंतर चूक लक्षात आल्यावर सुधारित बिल पाठवण्यात आले आहे.

– राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी