‘मी तरण्यांसारखी चालू शकते आन् मास्तरांसारखं बोलू शकते.. मी गाववाल्यांची निराशा नाही करणार. मला लोकांसाठी काही तरी करायचं आहे. नाहीतर मग नुसतं नावापुरतं सरपंच होऊन काय उपेग?’

हे उद्गार आहेत एका सरपंच महिलेचे. त्यांचे नाव गंगूबाई भांबुरे. वय फक्त ९४ वर्षे. शिक्षण – इयत्ता शून्य, पण अंगी उपजत ग्रामीण शहाणपणा.

खेड तालुक्यातील ढोरे-भांबूरवाडीच्या सरपंचपदी गंगूबाई नुकत्याच बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे त्या किमान जिल्ह्य़ातील तरी सर्वात वृद्ध सरपंच ठरल्या आहेत. आठ महिन्यांपूर्वी गावच्या निवडणुकीत निवडून आल्या तेव्हाच त्या चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी अन्य एका महिला सरपंचपदी निवडून आल्या. त्यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिला आणि गावाने एकमताने त्यांच्याकडे गावकारभार दिला.

निवड अधिकृतरित्या जाहीर होताच जो-तो येऊन त्यांना शुभेच्छा देत होता. कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधी त्यांच्या घरी जमले होते. गंगूबाई अगदी बिनधास्तपणे त्यांच्याशी बोलत होत्या. सांगत होत्या, ‘मला लोकांशी बोलायला आवडतं.. अजून माझे कान ठणठणीत आहेत.. सगळं नीट ऐकू येत मला. माझं पहिलं काम काय असेल, तर आमच्या सात वाडय़ांतल्या अडिचशे शेतकऱ्यांना मदत करायचं. सगळ्यांची मिळून हजार हेक्टर जमीन आहे. पण दरवर्षी आठ महिने पाणीच नसतं. मग त्या जमिनीत ते काय पिकवणार?’

त्यांचा नातू राहुल भांबुरे. तो सांगत होता, की गावापासून दोन किलोमीटरवर कालवा आहे. पण थेंबभर पाणी मिळत नाही. गंगूबाई म्हणाल्या, ‘चासकमान धरण, नाहीतर कॅनालमधून गावाला पाईपलाईन टाका म्हणून पंतप्रधान मोदींना सांगणार आहे. गावकऱ्यांच्या वतीने मी मोदींना पत्र पाठवणार आहे.’ कोणी तरी शंका काढली, की मोदी त्याची दखल घेतील का? तसे गंगूबाई म्हणाल्या, ‘का नाय करणार? तो माझ्या मुलासारखा. माझ्या थोरल्याचं वय ६६ आहे. मला कोणीतरी सांगितलं की मोदीपण त्याच वयाचा आहे.. ते शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं नक्की ऐकतील.’ हे बोलल्यावर हळूच मिश्किलपणे त्या म्हणाल्या, ‘मोदी आमच्या गावाला आले तरी काय हरकत नाही.’

गंगूबाईंना चार मुले आणि एक मुलगी आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. हे निवडणुकीला उभे राहण्याचे त्यांनी कसे ठरविले? घरच्यांनी आग्रह केला होता का? त्यावर त्यांचे उत्तर होते, ‘मी माझं ठरवते. कधी कधी तर त्याच्यावरून पोरांशी वाद पण होतो.’

पण गंगूबाईंचे वय झाले आहे. तशात त्या अंगठेबहाद्दर. त्या गावगाडा कसा हाकणार? त्या सांगतात, ‘शाळेत नाही गेले. पण मला वाचता येतं. अभंग तोंडपाठ आहेत माझ्या. आणि कामाचं म्हणाल, तर रोज मी पहाटे पाचला उठते. घरचं काम करते. मी कधी आजारी नाही पडले, की कधी औषधं नाही घेतली.’ सर्वानाच उत्सुकता होती, त्यांच्या या उत्साहाचे, प्रकृतीचे रहस्य जाणून घेण्यात. त्या म्हणाल्या, ‘कमी खा आणि जास्त जगा!’