पुणे : उच्च रक्तदाबामुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत आजही नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. रक्तदाब नियंत्रणासाठी चांगली जीवनशैली आवश्यक आहे, त्यामुळे चौरस आहार, नियमित व्यायाम आणि शांत झोप या गोष्टींचे महत्त्व ओळखण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

मंगळवारी (१७ मे) जागतिक उच्चरक्तदाब (हायपरटेन्शन) जागृती दिवस साजरा करण्यात येत आहे. यंदा ‘रक्तदाब मोजा, नियंत्रणात ठेवा आणि दीर्घायू व्हा’ या संकल्पनेवर जागतिक उच्च रक्तदाब जागृती दिवस साजरा करण्यात येत आहे. कामाचा ताण, वाढती स्पर्धा, आर्थिक आणि कौटुंबिक समस्या यांमुळे जीवनशैलीची घडी विस्कळीत झाली आहे. त्यातून उच्च रक्तदाब ही एक सर्वसाधारण तक्रार झाली आहे. त्यातूनच उच्च रक्तदाब तरुणांमध्येही दिसत असल्याचे समोर येत आहे.

सह्याद्री रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. अतुल जोशी म्हणाले, तरुणांमधील लठ्ठपणा, तंबाखू सेवन तसेच धूम्रपान आणि बदललेली जीवनशैली ही उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत. कुटुंबातील कोणाला उच्च रक्तदाब असेल तर तरुणांनी रक्तदाबाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करूू नये. सतत थकवा येणे, सकाळी उठल्यावर डोके दुखणे, चिंता, छातीत दुखणे, संभ्रम अशी काही लक्षणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी लक्षणे नियंत्रणात आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळय़ा बंद किंवा कमी करू नये. मेंदूमध्ये रक्तस्राव होणाऱ्या बहुतेक रुग्णांमध्ये हे प्रमुख कारण दिसत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

शहरी भागात प्रमाण जास्त

  • सतत धावपळीचे जीवन असलेल्या आणि सकस आहाराकडे दुर्लक्ष होत असलेल्या शहरी भागात उच्च रक्तदाबाचे प्रमाण जास्त आहे. शहरामध्ये २६ टक्के पुरुषांमध्ये तर २३ टक्के महिलांमध्ये उच्च रक्तदाबाची लागण झाली आहे. ग्रामीण भागातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे सुमारे २३ आणि २० टक्के आहे.
  • सर्वच गटांमध्ये उच्च रक्तदाबाची बाधा आर्थिकदृष्टय़ा सर्व गटांमध्ये उच्च रक्तदाबाच्या आजार असून गटानिहाय या आजाराचे प्रमाणही वाढत असल्याचे आढळले आहे. उच्च वर्गामध्ये हे प्रमाण जास्त असले तरी दुर्बल घटकांमध्येही नोंद घेण्याइतपत आहे.