लष्कराच्या दक्षिण विभागाचे (सदर्न कमांड) माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ए. के. सिंग यांनी अंदमान-निकोबारच्या अकराव्या नायब राज्यपालपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये सिंग यांचा शपथविधी पार पडला.
सिंग यांनी घोडदळ, टी-९ टँक ब्रिगेड, आर्मड डिव्हिजन, स्ट्राईक वन (कॉर्पस्) या तुकडय़ांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या अधिकाराखालील ५० लष्करी छावण्यांमध्ये सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. त्यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुण्यात मुख्यालय असलेल्या लष्कराच्या दक्षिण विभागाचे ते प्रमुख होते. ‘माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि मला दिलेल्या जबाबदारीमुळे मी भारावून गेलो आहे,’ असे मत सिंग यांनी व्यक्त केले. परिस्थितीचे भान ठेवून सुरक्षा आणि समतोल विकासाकडे लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले.