स्वत:ची ओळख माहीत नाही, घरदाराचा पत्ता नाही, नातलगांपैकी कुणाचा मागमूस नाही आणि हे सगळे कमीच म्हणून ‘मनोरुग्ण’ किंवा चक्क ‘वेडा’ असा शिक्का बसलेला. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयच ज्यांचे घर आहे अशा १४० जणांना आता आधार कार्डाद्वारे स्वत:ची ओळख मिळाली आहे.
मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांनी ही माहिती दिली. मनोरुग्णालय प्रशासनाने ज्यांचे कुणीच नाही अशा १४० मनोरुग्णांचे आधार कार्ड काढले आहे. यातील १०० मनोरुग्णांना आधार कार्ड मिळाले असून ४० जणांच्या कार्डाची प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. भैलुमे म्हणाले, ‘‘काही मनोरुग्ण गेल्या ५ ते २० वर्षांपासून येरवडा मनोरुग्णालयात राहात आहेत. या मनोरुग्णांपैकी काहींना पोलिसांतर्फे दाखल करण्यात आले आहे तर काहींना बेघर भटकणारे मनोरुग्ण म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांना घरदार नसल्यामुळे जोपर्यंत कुणी त्यांची जबाबदारी घ्यायला तयार होत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर सोडता येत नाही. अशा मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी मनोरुग्णालय प्रयत्न करत असून त्याअंतर्गत त्यांची आधार कार्ड काढण्यात आली आहेत. या मनोरुग्णांची जबाबदारी एखाद्या सामाजिक संस्थेने घेतल्यास त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत आधार कार्डावर मिळणाऱ्या लाभांचा फायदा त्यांना मिळू शकेल.’’
गेल्या एका वर्षांत बेघर मनोरुग्णांपैकी पाच महिलांची जबाबदारी ‘माहेर’ या संस्थेने घेतली आहे. बाहेरच्या राज्यांमधील काही मनोरुग्णांनाही या ठिकाणी दाखल केले जात असून हे मनोरुग्ण स्वत:चा पत्ता सांगू शकल्यास त्यांच्या नातेवाइकांना शोधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. भैलुमे यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात परराज्यातील ५ ते ७ मनोरुग्णांना अशा प्रकारे स्वत:च्या घरी पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले.
मानसिक परिस्थिती बरी असणाऱ्या मनोरुग्णांना कामात गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्याकडून कागदी पिशव्या, तक्ते, आकाशकंदील, पणत्या, उदबत्त्या अशा वस्तू मनोरुग्णालयात बनवून घेतल्या जातात. या वस्तू विकून जमा झालेले पैसे मनोरुग्णांना देण्यासाठी सध्या प्राथमिक तत्त्वावर १० मनोरुग्णांची बँकेत खाती उघडण्यात आली आहेत, असेही डॉ. भैलुमे यांनी सांगितले.