डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सुपारी देऊन केल्याचे पुढे येत असल्यामुळे पुणे पोलिसांकडून राज्यातील विविध कारागृहातील सराईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली असून, राज्यातील कारागृहातून संचित रजेवर (पॅरोल) सुटलेले सुमारे दोनशे कैदी फरार झाले आहेत. फरार कैद्यांमध्ये महत्त्वाच्या सराईत गुन्हेगार व ‘शार्प शूटर’चा समावेश आहे. त्यामुळे दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करताना या फरार कैद्यांमधील २५ ते ३० वयोगटातील सराईत गुन्हेगांराचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
डॉ. दाभोलकर यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या घटनेला आठ दिवस उलटून गेले तरी आरोपी सापडलेले नाहीत. या गुन्ह्य़ाचा तपास वेगवेगळ्या शक्यता समोर ठेवून केला जात आहे. त्यासाठी पुणे गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक, मुंबई पोलीस हल्लेखोराचा तपास घेतला आहे. पोलिसांची पथके विविध शहरात जाऊन कसून माहिती घेत आहेत. डॉ. दाभोलकर यांची हत्या ज्या पद्धतीने झाली, त्यावरून सुपारी घेऊन ही हत्या केली या निष्कर्षांवर पोलीस पोहोचले आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या टोळ्यांकडे चौकशी सुरू केली आहे. गुन्हे शाखेच्या एका पथकाने राज्यातील विविध कारागृहात जाऊन सराईत गुन्हेगारांकडे चौकशी केली. त्याच बरोबर त्या ठिकाणाहून संचित रजेवर सुटलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली असता जवळजवळ दोनशे सराईत गुन्हेगार संचित रजेवर बाहेर आल्यानंतर परतलेच नसल्याचे तपासात पुढे आले आहे.
संचित रजेवर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, हे तपासण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर हल्ला करणारे आरोपी साधारण २५ ते ३० वयोगटातील असल्यामुळे पोलिसांनी संचित रजेवर सुटलेल्या याच वयोगटातील आरोपींवर लक्ष केंद्रित केले आहे. या सराईत गुन्हेगारांचा माग काढला जात आहे. याबाबत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले, की राज्यातील येरवडा, कल्याण, तळोजा, नाशिक या कारागृहात असलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली आहे. या ठिकाणाहून संचित रजेवर सुटल्यानंतर परत न गेलेल्या सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात येत आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत त्यांच्याकडून काही माहिती मिळतेय का हे पाहिले जात आहे.