राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ात पशुखाद्य वाटप करण्याचा ‘महानंद’ दुग्धशाळेचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे दुष्काळग्रस्त पशुपालक व शेतक ऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
 महानंद दुग्धशाळेतर्फे येथील कात्रज डेअरीत आयोजित दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांच्या छावण्यांमधील जनावरांना पशुखाद्य वाटप करण्याचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री मधुकर चव्हाण, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री गुलाबराव देवकर, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, महापौर वैशाली बनकर, राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, व्यवस्थापकीय संचालक रवींद्र सावंत आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, सध्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत असून यात मोलाचे पशुधन होरपळले जात आहे. दुष्काळ निवारणाच्या विविध उपाययोजनांसाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.