बनावट नोंदी करून दौड रेल्वेत डेपोतील दहा कोटीचा डिझेल गैरव्यवहार प्रकरण मॅनेज करण्यासाठी २७ लाख रूपये घेतल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील एक वकील व त्याच्या सहायकास अटक केली आहे. हे पैसे न्यायाधीश आणि सरकारी वकिलांना मॅनेज करण्यासाठी घेतल्याचे समोर आले आहे. या दोघांना विशेष न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्ड यांनी १३ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अ‍ॅड. हेमंत गोविंद थोरात आणि लक्ष्मण देवराम देशमुख अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात पूर्वी सीबीआयने पोपट तुकाराम कदम, अशोक जगन्नाथ वाईकर (रा. दोघेही-दौंड) आणि दौंड डेपोचे मुख्य लोको निरीक्षक वीरसिंग चौधरी याना अटक करण्यात आली आहे. याप्रकणी चौधरीकडे केलेल्या तपासात हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी अ‍ॅड. थोरात याला फेब्रुवारी ते २४ एप्रिल दरम्यान २७ लाख रूपये दिले असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार अ‍ॅड. थोरातसह दोघांवर एक मे रोजी गुन्हा दाखल करून सीबीआयने त्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख २७ हजार रूपये हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणातील दौंड डेपोचा निरीक्षक चौधरी याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडे अधिक तपासासाठी आठ मे पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.