मराठी सारस्वतांचा मेळा असलेल्या आगामी ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तब्बल दहा ठिकाणांहून निमंत्रणे आली आहेत. दोन अंकी निमंत्रणे येण्याचा साहित्य महामंडळाच्या इतिहासातील हा उच्चांक आहे. बडोदे येथील मराठी वाङ्मय परिषद आणि पंजाब राज्यातील अमृतसर येथील घुमानमधील संत नामदेव गुरुद्वारा सभा या संस्थांनी संमेलन भरविण्याची उत्सुकता दर्शविली आहे.
सासवड येथील ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात आगामी संमेलनासाठी सहा ठिकाणांहून निमंत्रणे आली असल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केली होती. साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार संमेलनासाठी निमंत्रणे स्वीकारण्याची ३१ मार्च ही अंतिम मुदत होती. त्यामध्ये आणखी चार ठिकाणच्या निमंत्रणांची भर पडली असून महामंडळाच्या कारकीर्दीत प्रथमच निमंत्रणांनी दोन आकडी संख्या गाठली आहे.
सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, कल्याण येथील सार्वजनिक वाचनालय, कळवे (जि. ठाणे) येथील जवाहर वाचनालय, कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, जालना येथील महाराष्ट्र रात्री पाठशाला शिक्षा समिती, मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा, बडोदे येथील मराठी वाङ्मय परिषद, चंद्रपूर जिल्ह्य़ातील तळोशी (नागभीड) येथील कल्याण शिक्षण संस्था, डोंबिवली पूर्व (जि. ठाणे) येथील कल्याण-शीळ रस्त्यावरील माणपाडा येथील आगरी यूथ फोरम आणि घुमान (अमृतसर, पंजाब) अशा दहा ठिकाणांहून आगामी संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत.
साहित्य महामंडळाच्या ३१ मे रोजी पुण्यामध्ये होत असलेल्या बैठकीमध्ये या दहा निमंत्रणांवर चर्चा होणार आहे. त्यापैकी तीन ठिकाणांची निवड करण्यात येणार आहे. या तीन ठिकाणांना महामंडळाची स्थळ निवड समिती भेट देणार आहे. स्थळ निवड समितीच्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन आगामी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित केले जाणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.