टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भक्तिकल्लोळ.., माउली- माउली असा अखंड जयघोष.. वैष्णवांच्या मेळ्याने बहरून आलेला इंद्रायणीचा काठ..माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा.. अशा वातावरणात सोमवारी आळंदीमध्ये कार्तिकीचा सोहळा साजरा झाला अन् अवघी अलंकापुरी माउलीच्या भक्तिरंगात रंगून गेली!
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशीच्या भक्ती पर्वणीसाठी मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव आळंदीत दाखल झाले होते. त्यामुळे अवघी नगरीच भक्तिरंगात न्हावून निघाली होती. कार्तिकीच्या सोहळ्यात सोमवारी ही भक्ती टिपेला पोहोचली. पहाटेपासूनच वारकऱ्यांच्या राहुटय़ा व धर्मशाळांमधून अभंगाच्या सुरावटी निघू लागल्या. टाळ- मृदंगाचा गरजही सुरू झाला. स्नानासाठी इंद्रायणीच्या तीरावर वारकऱ्यांची गर्दी झाली होती. कार्तिकीसाठी इंद्रायणीला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ती दुथडी भरून वाहत आहे. त्यानुसार भाविकांची भक्तीही जणू दुथडी भरून वाहत होती. दुसरीकडे माउलींच्या मंदिरामध्ये पहाटेपासून विविध धार्मिक विधीला सुरुवात झाली होती. स्नानानंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी पूर्णपणे भरून गेली होती.
दुपारी साडेबाराच्या सुमारास नगर प्रदक्षिणेला सुरुवात करण्यात आली. त्या वेळी वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये भर पडली. या वेळी विविध दिंडय़ांनी अभंग सादर केले. याच वेळी इंद्रायणीच्या तीरावर वैष्णवांचे खेळ रंगले. भक्तीच्या या खेळांमध्येच पालखीची नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पालखीने पुन्हा मंदिरात प्रवेश केला. संध्याकाळी उशिरापर्यंत भक्तीचा हा सोहळा रंगला होता. यंदाच्या सोहळ्यासाठी सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आळंदी पालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यंदा वारीमध्ये स्वच्छता व व्यसनमुक्तीचा संदेशही देण्यात येत होता.
सोहळ्यामध्ये मंगळवारी दुपारी रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी माउलींचा संजीवन समाधीचा सोहळा रंगणार आहे. यंदाच्या वारीमध्ये चार लाखांहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याने यंदा वारकऱ्यांची संख्या काहीशी घटल्याचे दिसून आले.

Konkankanya, Janshatabdi,
जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!