वाढत्या शहरीकरणामुळे आज शहरांची वाढ झपाटय़ाने होते आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात निर्माण झाला आहे. शहरापासून लांब अंतरावर असलेल्या आयटी कंपन्यांत काम करणाऱ्या लोकांना काळजी असते ती कामावर वेळेवर पोहाचण्याची. त्यांच्यासाठी अँड्रॉइडवर चालणारे अतिशय उपयुक्त अशा sRide अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. हे अ‍ॅप ‘कार पुलिंग’ या संकल्पनेवर आधारित आहे.
कार पुलिंग म्हणजे आपण ज्या ठिकाणी जात आहोत, त्याच ठिकाणी अन्य कोणाला जायचे असल्यास एकाच वाहनात सोबत घेऊन जाणे. ही संकल्पना परदेशात अतिशय रुळलेली आहे. त्याच संकल्पनेवर आधारित अ‍ॅपची निर्मिती लक्ष्णा झा यांच्याकडून करण्यात आली आहे.
अ‍ॅड्रॉइड व आयओएस यासाठी बनवलेले हे अ‍ॅप वापरण्यास अतिशय सोपे आहे. हे अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती म्हणजे नाव, राहण्याचे ठिकाण, आपल्या कार्यालयाचे नाव, आपला मोबाइल नंबर इ. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकानातून ही संपूर्ण माहिती तपासली जाते. त्यानंतर या अ‍ॅपमध्ये आपल्या ऑफिसचा पत्ता व आपण कोणत्या ठिकाणाहून तेथे जाणार याची माहिती भरायची. त्यानंतर आपल्या मार्गावरूनच अन्य कोणी जात असेल तर आपल्याला त्यांची यादी अ‍ॅप दाखवतो. मग आपण त्या व्यक्तींशी संपर्क करून आपल्या गंतव्य ठिकाणी पोहोचू शकतो.
या अ‍ॅपची सुरुवात पुण्यात सुमारे दोन महिन्यांपूर्वी झाली आहे. संपूर्ण भारतात फक्त पुण्यातच हे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. आयटी आभियंता असलेल्या लक्ष्णा झा यांनी या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. सध्या विविध आयटी कंपन्यांमधले ३००० लोक या अ‍ॅपचा वापर करत आहेत. या अ‍ॅपमुळे होणारा महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळेची आणि पैशाची बचत. कारण यासाठी ३ रुपये प्रति किलोमीटर असा दर अ‍ॅपतर्फे ठरवण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वत:चे वाहन अथवा रिक्षाचा वापर करण्यापेक्षा अ‍ॅप चा मदत घेणे नक्कीच फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे याचा वापर केल्यामुळे शहराच्या वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.
अ‍ॅप नेमके कसे काम करते?
एखाद्याला डेक्कन जिमखान्यावरून हिंजवडी येथे जायचे असेल, तर अ‍ॅप मध्ये डेक्कन जिमखाना ते हिंजवडी असा मार्ग टाकायचा. त्यानंतर एका क्लिक मध्ये आपल्याला डेक्कनपासून हिंजवडी येथे जाणाऱ्या इतर व्यक्तींची यादी व त्यांचा संपर्क क्रमांक मिळणार. मग त्यांच्याशी संपर्क साधून हिंजवडीपर्यंत जाता येते. अशाप्रकारे आपल्याला कुठेही जायचे असल्यास आपण याचा वापर करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: App sride it company android
First published on: 03-07-2015 at 03:35 IST