लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विशेष मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मुलीने खाणाखुणांनी न्यायालयात साक्ष दिली. पीडित मुलीची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपीला न्यायालायने दहा हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले असून, दंड न भरल्यास न्यायालायने एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद निकालपत्रात केली आहे.

प्रताप बबनराव भोसुरे (वय ५९ रा. धानोरे ता. शिरूर जि. पुणे) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १८ मे २०१५ रोजी मुलगी रानात शेळ्यांना घेऊन गेली होती. आरोपी भोसुरेने तिला गोळी देण्याचे आमिष दाखवून रानातील एका निर्जन जागेत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी गर्भवती झाली. आरोपीला याप्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून गेले आठ वर्षे ११ महिने आरोपी येरवडा कारागृहात आहे. या खटल्यात सरकार पक्षाकडून ॲड. लीना पाठक यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती.

आणखी वाचा-अजित पवारांना धक्का! वेल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पीडित मुलीने न्यायालयात खाणखुणांनी साक्ष दिली. कॅमेऱ्याद्वारे मुलीची साक्ष नोंदवून घेण्यात आली. साक्ष, तसेच वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरून न्यायालायने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी याप्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार विद्याधर निचित, एस. बी. भागवत, ज्ञानदेव सोनवणे यांनी सहाय केले.