निश्चलनीकरणानंतर रोखरहित व्यवहाराचा नारा दिला जात असला तरी रोख व्यवहार मोबाइल बँकिंगमध्ये आणण्यासाठी एका पुणेकराने दोन वर्षांपूर्वीच एक अ‍ॅप तयार करून त्याचा वापरही सुरू केला आहे. मात्र पैसे स्वीकारणाऱ्याकडे स्मार्ट फोन किंवा इंटरनेटची आवश्यकता नसल्याने वापरण्यास सोपी असणारी अ‍ॅपची ही योजना बँकांकडून पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने तळागाळातील व्यवहारात व्यापकपणे पोहोचवणे शक्य झालेले नाही. रिक्षा पंचायतीच्या पुढाकाराने रिक्षाभाडय़ासाठी या अ‍ॅपचा वापर दीड वर्षांपूर्वी सुरू झाला होता, मात्र बँकांकडून साहाय्य न झाल्याने तेही बंद करण्यात आले.

चलनटंचाईच्या काळामध्ये सध्या मोबाइल बँकिंगला महत्त्व प्राप्त झाले आहे. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी सध्या विदेशी कंपन्यांच्या विविध अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, तळागाळात व अगदी खेडय़ातही होणारे किरकोळ व्यवहार मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून करता यावेत, त्यातून सुटय़ा पैशांचीही समस्या दूर व्हावी, या उद्देशाने विभव केळकर यांनी दोन वर्षांपूर्वीच रोखरहित व्यवहाराची कल्पना मांडून ‘एम सिक्के’ हे मोबाइल अ‍ॅप तयार केले. त्यासाठी त्यांनी स्वत: वेगवेगळ्या १९ बँकांमध्ये खातीही उघडली. या अ‍ॅपमध्ये पैसे स्वीकारणाऱ्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट असण्याची गरज नाही.

पैसे स्वीकारणाऱ्याच्या बँकेतील खात्याची माहिती एका ‘क्यू आर कोड’मध्ये साठवली जाते. या कोडची प्रिंट संबंधिताने जवळ ठेवायची. पैसे देणाऱ्याने अ‍ॅपच्या माध्यमातून हा कोड फोटो स्कॅन केल्यानंतर पैसे घेणाऱ्याच्या बँक त्याचा खाते क्रमांक येतो. त्यात देणे असलेले रक्कम आपल्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात सहज पाठविता येते. पैसे पाठविल्याचा व पैसे मिळाल्याचा एसएमएस दोघांनाही येतो. अगदी पंधरा सेकंदाच्या कालावधीत ही प्रक्रिया पार पडते. बँकेकडून एसएमएस येत असल्याने व्यवहारात पारदर्शकताही आणता येते.

रोखरहित व्यवहाराबाबत आपण दोन वर्षांपूर्वीच संकल्पना मांडली. स्वस्त व सोपा पर्याय तसेच अगदी तळागाळातील व्यक्तीही मोबाइल बँकिंगमध्ये यावी, यासाठी एम सिक्के अ‍ॅप तयार केले. अगदी खालून काम सुरू करावे म्हणून रिक्षावाल्यांपासून अ‍ॅपची सुरुवात केली. msikkay.in या संकेतस्थळावर अ‍ॅपची माहिती आहे. आठ हजार लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. मात्र, अद्यापही अनेक बँकांमध्ये याबाबत जागरुकता नाही. त्याचप्रमाणे बँकांनी पाच हजारांपर्यंतच्या रकमांसाठी देवाण-घेवाण शुल्क कमी करणे गरजेचे आहे. सध्या धोरणात्मक पाठिंबा मिळतो आहे, मात्र बँकांचा पाठिंबा मिळायला हवा.  – विभव केळकर, अ‍ॅपचे निर्माते