राज्यातील शेतकरी भिकारी नाहीत, त्यांना बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधाराचीही गरज आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटेकर म्हणाले, “राग अनावर झाल्याचा किंवा आत्महत्येचा विचार मनात आल्याच्या त्या क्षणाला थांबवून ठेवायचा प्रयत्न करा. प्रत्येकाला आपण पुरे नाही पडू शकत. पण त्यांच्याशी निदान दोन गोष्टी बोलू शकतो. राजकारण्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तरी चालेल पण त्यांच्या खांद्यावर हाततरी ठेवा. तो दिलासा पाहिजे, नुसती कर्जमाफी नको ते भिकारी थोडीच आहेत. आभाळातील बाप रागावला म्हणून त्यांच्यावर अशी परिस्थिती झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला तुम्ही म्हणाल ती किंमत देता? असं कसं चालेल. मॉलमध्ये करता का घासाघीस? मग शेतकऱ्यांकडेही भाव करू नका. कांद्याचे भाव वाढले की सगळं वेळापत्रक बिघडत, असा उहापोह केला जातो. त्यामुळे यावरही विचार करण्याची गरज आहे.”

दरम्यान, देशतील सध्याच्या विविध परिस्थितींवर भाष्य करताना पाटेकर म्हणाले, दंगलीच्या वेळी सगळ्यात जास्त हिंसक कोण होत असेल तर तो सामान्य माणूस होतो. आतमधून तो तुंबलेला असतो. तो कधी व्यक्त झालेला नसतो. सामान्य नागरिक ऐकतो, सहन करतो पण प्रश्न विचारत नाही. मात्र, त्यांनी गप्प राहता कामा नये राजकारण्यांना त्यांनी प्रश्न विचारायलाच पाहिजेत. आपण त्यांना मतं देतो, मग त्यांना प्रश्न विचारण्याचाही आपल्याला अधिकार आहे. पाच वर्षांनी एकदा मताचा अधिकार मिळतो. मग, त्याचे असे धिंदवडे का काढता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.