खोटे सोन्याचे मणी दाखवून फसविणाऱ्या महिलेला नागरिकांच्या मदतीने एका महिलेने पकडून पोलिसांकडे दिले. मात्र, काही तासातच ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेल्यानंतर त्या महिलेने महिला पोलिसांना धक्का देऊन पलायन केले.
लोविंगा मनू काडीवाले (वय ४७, रा. स्वारगेटजवळ, पदपथ) असे पळून गेलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या लिज्जत पापड कंपनीजवळून मंगळवारी दुपारी पुष्पा मोरे (वय ४५, रा. खिलारेवाडी) या जात होत्या. त्या वेळी लोविंगाने त्यांना काही मणी दाखवून ते सोन्याचे असल्याचे सांगितले. त्या मण्यांच्या बदल्यात मंगळसूत्र आणि पायातील पाटल्या घेतल्या. ते मणी कागदात बांधल्याचे भासवता त्यामध्ये वाळू बांधून दिली. सोन्याचे दागिने घेऊन लोविंगा गेली. पण, मोरे यांना संशय आल्याने त्यांनी कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यात वाळू असल्याचे दिसून आले. मोरे यांनी तत्काळ लोविंगा गेलेल्या दिशेने गेली. तेथील रिक्षावाल्यांना विचारल्यानंतर वर्णन सांगितलेल्या महिलेला स्वारगेट येथे गेल्याचे सांगितले. त्यांनी ही रिक्षा पकडून स्वारगेटला गेल्या. त्यांनी त्या ठिकाणी शोधाशोध केली पण ती दिसून आली नाही. मोरे या शिवाजी रस्त्याने परत निघाल्या असता ती महिला त्यांना एका महिलेला मणी दाखवत असताना दिसली. त्यांनी चोर-चोर म्हणत नागरिकांच्या मदतीने महिलेला पकडले. सुरुवातीला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेऊन डेक्कन पोलिसांकडे दिले.
लोविंगाला पकडल्यानंतर तिला मंगळवारी रात्रीच ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. रक्तदाब वाढल्यामुळे तिला अ‍ॅडमिट करण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार तिला १९ वॉर्डमध्ये उपचारासाठी अ‍ॅडमिट केले. त्या ठिकाणी दोन पोलीस नेमण्यात आले होते. पहाटेच्या पाचच्या सुमारास दोन महिला कर्मचाऱ्यांना धक्का देऊन ती पळून गेली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांनी दिली.