एका गुन्ह्य़ात आरोपीच्या बाजूने तपास करण्यासाठी त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांची लाच घेताना दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शिवाजी शिंगटे आणि एका पोलीस कर्मचाऱ्यास शुक्रवारी रात्री रंगेहाथ पकडले.
दत्तात्रय विठोबा नाईक असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बाळासाहेब हरपळे (रा. फुरसुंगी) यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने हरपळे यांच्यावर २७ मार्च २०१४ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला होते. त्यानुसार हरपाळेंवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्य़ात हरपाळे यांच्या बाजूने तपास करण्यासाठी शिंगटे यांनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी तीन लाख रुपये ४ एप्रिल रोजी त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर राहिलेले दोन लाख रुपये तो मागत होता. हरपाळे यांच्या बांधकाम साईट सुरू आहेत. त्यामध्ये शिंगटे याने पाच-पाच लाखांच्या सदनिका बुकींगच्या दोन पावत्या देण्याची मागणी केली होती. हरपाळे यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. हरपाळे यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी रात्री हॉटेल कल्पना येथे सापळा रचण्यात आला. शिंगटे व पोलीस कर्मचारी नाईक यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.