नक्षलवादाच्या संदर्भात पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांसोबत काम करणार असल्याचे राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसाळकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांना प्रशिक्षणाबरोबरच त्यांच्याशी अधिकाधिक संवाद वाढवून नक्षलवाद विरोधी कारवाईत सहभागी करून घेतले जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
एटीएसच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर फणसाळकर यांनी पहिल्यांदाच पुण्यातील एटीएसच्या कार्यालयास भेट दिली. त्याबरोबरच एटीएसकडे असलेल्या विविध गुन्ह्य़ांसंदर्भात येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्यासोबत सुरक्षितता आणि नक्षलवादाबरोबरच विविध मुद्यांवर चर्चा केली. पुणे एटीएसने तळेगाव परिसरातून नक्षलवादी संघटनेचा मोठा नेता के. मुरलीधरन उर्फ अजित याच्यासह दोघांना अटक केली होती. गेल्या काही वर्षांतून तिसरा मोठा नक्षलवादी अटक केल्यामुळे पुणे परिसरावर नक्षलवाद्यांचे लक्ष असल्याचे दिसून आले आहे.
या पाश्र्वभूमीवरच एटीएस प्रमुखांनी पुण्यात येऊन पोलीस आयुक्तांशी विविध मुद्यांवर चर्चा केली. त्याबरोबरच एटीएसकडून पाहिजे असलेले आणि फरार झालेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पाहिजे असलेले १९७ तर फरार झालेले ४७ आरोपी आहेत. त्यामध्ये संशयित दहशतवादी, बनावट नोटा चलनात आणणारे आरोपी, शस्त्रास्त्र तस्करीतील आरोपींचा समावेश आहे. एटीएसकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात असल्याचे फणसाळकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ats will work with pune city and rural police
First published on: 14-05-2015 at 03:15 IST