पुणे : दिवाळीची सुटी आणि एसटीचा संप अशा काही कारणांमुळे राज्यातील राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅस) चाचणीच्या उपस्थितीवर परिणाम झाला. राज्यात निवडलेल्या शाळांमधील तिसरी, पाचवी, आठवी, दहावीच्या ८० टक्के विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. 

सर्वेक्षणाला मिळालेल्या प्रतिसादाची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून देण्यात आली. देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीतील संपादणुकीचे मूल्यांकन करणे; तसेच देशातील शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन पातळय़ांवर ही सर्वेक्षण चाचणी घेतली जाते. सर्वेक्षणातील शाळा ‘रँडम सॅम्पिलग’ पद्धतीने निवडण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात सुसूत्रता येण्यासाठी हे सर्वेक्षण देशभरात एकाच दिवशी करण्यात येते. यापूर्वी हे सर्वेक्षण २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत झाले होते. त्यानुसार २०२१-२२ शैक्षणिक वर्षांतील नॅस सर्वेक्षण शुक्रवारी एकाचवेळी निवडलेल्या शाळांमध्ये झाले. सर्वेक्षणासाठी १०० टक्के उपस्थितीचे निर्देश देण्यात आले होते. मात्र दिवाळीच्या सुटीमुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी असल्याने, एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला.

सर्वेक्षणासाठी राज्यातील सात हजार ३३० शाळांमधील दोन लाख ३४ हजार ५५ विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचे होते. त्यानुसार राज्यातील शाळांमधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. निवडलेल्या शाळांमध्ये सर्वेक्षण प्रक्रिया सुरळीत झाली. सर्वेक्षणासाठी सर्वच शिक्षक उपस्थित होते. अनेक शाळांची माहिती अद्याप यायची असल्याने या सर्वेक्षणाच्या टक्केवारीत वाढ होऊ शकते, अशी माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली आहे.