भोर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडाला असून चार प्रभागांतील १७ जागांपैकी १३ जागा काँग्रेसने मिळवून निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. 
नगरपरिषदेची सत्ता माझ्या हातात द्या, एका वर्षांत दहा कोटी रुपये देतो. एवढेच नाहीतर मोकळ्या हाताने मला परत पाठवू नका, अशा शब्दात हात जोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विनंतीला येथील मतदारांनी कात्रजचा घाट दाखवत आमदार संग्राम थोपटे यांच्यावर विश्वास दाखवला. केवळ चार जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. भाजपा, शिवसेना, मनसे यांच्या उमेदवारांना अनामत रकमाही वाचवता आलेल्या नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खास जाहीर सभा होऊन मतदारांना ‘१७ उमेदवार निवडून देऊन एकहाती सत्ता द्या. दहा कोटी रुपये एका वर्षांत देतो. अतिसुसज्ज अशा इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करतो. भोरची बारामती करतो’ अशी प्रलोभने दाखविली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन वेळा व जिल्हाध्यक्षासह विजय कोलते, इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शहरात पदयात्रा काढून मतदारांना आवाहन केले होते. तर आमदार थोपटे यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही येथे जाहीर सभा घेऊन काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले होते. शेवटच्या दिवसापर्यंत अत्यंत चुरस वाढत चाललेल्या या निवडणुकीमध्ये आमदार थोपटेंनी आपली ताकद पणाला लावून राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा धोबीपछाड केला.
नवनिर्वाचित सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे
किसन रघुनाथ वीर, तृप्ती जगदीश किरवे, चंद्रकांत रामचंद्र सागळे, देविदास अरविंद गायकवाड, उमेश कृष्णराव देशमुख, विजयालक्ष्मी जीवन पाठक, तानाजी सादू तारू, जयश्री राजकुमार शिंदे, संजय दत्तात्रय जगताप, दीपाली सतीश शेटे, गजानन किसन दानवले, शुभांगी अनिल पवार, मंजू प्रवीण कांबळे (सर्व जण काँग्रेस पक्ष) राजश्री विजय रावळ, यशवंत बाबूराव डाळ, मनीषा विठ्ठल शिंदे, सुनीता सुनील कदम (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस).