पिंपरी : शहरी, गावठाण आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या भोसरी मतदारसंघावर भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. तीनवेळा निवडून आलेले भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे या मतदारसंघावर प्रभुत्त्व आहे. भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची येथे ताकद आहे. विधानसभेला लांडगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून लढलेले, आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात असलेले अजित गव्हाणे यांच्यात लढत झाली होती. विधानसभेला आलेली कटुता कमी झाली नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची शक्यता धूसर असून, भोसरीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात लढत होण्याची शक्यता आहे.
भोसरी मतदारसंघात १३ प्रभागांचा समावेश आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेली प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच कायम आहे. त्यामुळे प्रभाग ‘जैसे थे’ आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भोसरीतील १३ प्रभागांपैकी पाच प्रभागांतून भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे एकूण ३२ नगरसेवक या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यापैकी आठ जणांनी पक्षांतर केले. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग क्रमांक १२ तळवडे गावठाण-रुपीनगरमधून चारही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते.
मागील पंचवार्षिकमध्ये दोनवेळा महापौरपद, चारवेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि सभागृह नेते अशी पदे भोसरीच्या वाट्याला आली. समाविष्ट गावाला महापौर पद दिल्याने भाजपबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून, भाजपकडून जुन्यांना संधी दिली जाणार की नवीन चेहरे रिंगणात उतरविणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आठ जणांनी पक्ष सोडल्याने भाजपला नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत.
प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाणमध्ये भाजपखालोखाल राष्ट्रवादीची ताकद आहे. तेथून भाजपचे दोन, राष्ट्रवादीचा एक आणि अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत दत्ता साने यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव यश हे सक्रिय झाले आहेत. महापौरपद भूषविलेल्या प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी प्रभागात भाजपची ताकद आहे. भाजपकडून निवडून आलेले वसंत बोराटे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. माजी महापौर राहुल जाधव पुन्हा लढणार की पत्नीला निवडणुकीत उतरविणार त्यावरून या प्रभागातील लढती ठरतील. प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. प्रभाग क्रमांक सात भोसरी गावठाण आणि प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगरमध्ये चारवेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले होते. भीमाबाई फुगे राष्ट्रवादीत असून, सीमा सावळे या तटस्थ दिसतात.
भोसरीतून विधानसभा निवडणूक लढलेले अजित गव्हाणे हे प्रभाग क्रमांक पाच रामनगर, चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर या प्रभागातून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यांनी आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांचा पराभव केला होता. शरद पवार गटातून अजित पवार गटात आलेले गव्हाणे येथून पुन्हा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभेला लांडगे आणि गव्हाणे यांच्यातील कटुता वाढली. त्यामुळे आमदार लांडगे हे पुन्हा आपल्या बंधूला या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवितात की समर्थकाला उमेदवारी देतात, यावर प्रभागातील विजयाचे गणित अवलंबून आहे.
आमदार लांडगे यांचा कस
शहरातील भाजपच्या चार आमदारांपैकी आमदार महेश लांडगे हे वरिष्ठ आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असणार आहे. लांडगे हे पालकमंत्री अजित पवार यांचे कडवे विरोधक मानले जातात. पवार यांच्यावर उघडपणे टीका करतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शहरासह भोसरीतून भाजपचे अधिक नगरसेवक निवडून आणून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आमदार लांडगे यांचा कस लागणार आहे.