शिवछत्रपतींच्या साक्षीने सुराज्याची शपथ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपातील गदारोळानंतर भारतीय जनता पक्षाने प्रचाराची यंत्रणा कार्यान्वित केली असून पक्षाच्या सर्व उमेदवारांना सोमवारी सिंहगडावर शपथ देण्यात आली. शिवछत्रपतींच्या साक्षीने सुराज्याची शपथ घेत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नाराळ किल्ले सिंहगड येथे सकाळी फोडण्यात आला. पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख सुशासन देण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी शपथ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी घेतली.

शिवछत्रपतींच्या जयजयकारात, सनई, चौघडा आणि तुतारीच्या निनादात किल्ले सिंहगडावर भालदार-चोपदारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने सिंहगडावरील चारही दरवाजांना सुराज्याचे तोरण बांधण्यात आले. भाजप-रिपाइं युतीच्या प्रचाराचा प्रारंभ तेथे करण्यात आला.

‘केंद्रात, राज्यात आणि नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादन केली. त्याचप्रमाणे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष बनेल,’ असा विश्वास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रचारात आरोप-प्रत्यारोप न करता विकासकामांवर भर देणार असल्याचेही ते म्हणाले. शहराध्यक्ष योगेश गोगावले, संघटनमंत्री रवी भुसारी, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते नवनाथ कांबळे यावेळी उपस्थित होते. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी उमेदवारांना शपथ दिली.

पालकमंत्री बापट म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उदासीन भूमिकेमुळे शहरातील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. विकास करण्याची त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. त्याउलट भाजपने अडीच वर्षांच्या कालावधीत शहर विकासाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे त्याला ताकद देणे हेच आमचे काम आहे.

नाराजी दूर झाली

तिकीट वाटपाबाबत आता नाराजी उरलेली नाही. मतभेदही नाहीत, असे सांगून खासदार अनिल शिरोळे म्हणाले की, निवडणुकीसाठी सर्वानी एकत्रित येऊन काम करावे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidates visit sinhagad fort to starts election campaign
First published on: 07-02-2017 at 01:36 IST