पिंपरी : महापालिकेतील सत्तेचा मार्ग ठरविणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघावरील वर्चस्व आगामी महापालिका निवडणुकीत राखण्याचे मोठे आव्हान भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासून चिंचवडवर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या कुटुबीयांचे प्रभुत्व राहिले. २०१७ मध्ये चिंचवडमधून भाजपचे सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून आले होते. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमधून गतवेळेपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणून वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान त्यांचे बंधू आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप आणि भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासमोर असणार आहे.

राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड मतदारसंघात १३ प्रभाग असून सर्वाधिक ५२ नगरसेवक निवडून जातात. मागीलवेळी भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, प्रभाग २७ तापकीरनगर, रहाटणी, प्रभाग २९ पिंपळे गुरव आणि प्रभाग ३२ सांगवी या चार प्रभागांतून भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले होते. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, एकत्रित शिवसेनेचे सहा आणि चार अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या चार जणांनी पक्षांतर केले असून पक्षाला नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत.

चिंचवड भाजपमध्ये आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे तीन गट दिसून येतात. शिवसेना (शिंदे) पक्षाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे वास्तव्यही चिंचवडमधील थेरगावमध्ये आहे. जगताप कुटुंबाला विधानसभा निवडणुकीत प्रत्येकवेळी आव्हान देणारे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी वाकडचे महापालिकेत प्रतिनिधित्व केले. त्यामुळे चिंचवडमधील लढतींबाबत उत्सुकता असणार आहे.

प्रभाग क्रमांक २४ थेरगाव, पदमजी पेपर मिल, गणेशनगर या प्रभागातून एकत्रित शिवसेनेकडून नीलेश बारणे, सचिन भोसले निवडून आले होते. त्यापैकी भोसले हे शिवसेना (ठाकरे) पक्षात आहेत. या प्रभागातून खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित यांची निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यांचे पुतणे नीलेश येथून नगरसेवक होते. खासदार चिरंजिवाला की पुतण्याला रिंगणात उतरवितात याबाबत उत्सुकता असेल. प्रभाग क्रमांक २५ वाकडमधून एकत्रित शिवसेनेकडून राहुल कलाटे, रेखा दर्शले, अश्विनी वाघमारे आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे निवडून आले होते. येथे राहुल कलाटे यांची ताकद असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभा लढविल्यानंतर सद्य:स्थितीत कलाटे पक्षापासून अलिप्त दिसतात. कोणत्या पक्षातून लढायचे याबाबत त्यांची चाचपणी सुरू आहे. कलाटे यांच्या भूमिकेवर प्रभागातील लढती ठरतील.

प्रभाग क्रमांक २६ मधून भाजपकडून निवडून आलेले तुषार कामठे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. स्वत:सह पक्षातील उमेदवार निवडून येण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागरमधून भाजपचे दोन आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. शत्रुघ्न काटेंकडे आता भाजपचे शहराध्यक्षपद आहे. २०२३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लाखभर मते मिळविलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेले नाना काटे यांचेही येथे प्रभुत्व आहे. मागील वेळी नाना आणि त्यांच्या पत्नी शीतल निवडून आल्या होत्या. या प्रभागातून चारही नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान शत्रुघ्न आणि नाना यांच्यासमोर असणार आहे.

शत्रुघ्न काटे यांच्यासमोर नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शत्रुघ्न काटे इच्छुक आहेत. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काटे यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. त्यांच्यासोबत माजी नगरसेवकांचा एक मोठा गट आहे. उमेदवारी न मिळाल्याने कार्याध्यक्ष, त्यानंतर शहराध्यक्षपद देऊन काटे यांची नाराजी दूर केली. त्यामुळे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणून आपले नेतृत्व सिद्ध करण्याची आणि विधानसभेच्या उमेदवारीसाठी दावेदारी प्रबळ करण्याचे आव्हान काटे यांच्यासमोर आहे.