उपनगरांमध्ये बुक कॅफेंची वाढती संख्या

तरुणाई समाजमाध्यमांमध्ये व्यग्र असते, तरुणाई वाचत नाही अशी ओरड केली जात असताना बुक कॅफेचा नवा कल निर्माण होऊ लागला आहे. माफक शुल्क भरून, चहा-कॉफीच्या सोबतीने कितीही वेळ निवांत वाचत बसता येणाऱ्या बुक कॅफेंना वाचकांची पसंती मिळू लागली असून, उपनगरांमध्ये अशा बुक कॅफेंची संख्या वाढत आहे.

गेल्या एक-दोन वर्षांत बाणेर येथे पगदंडी, कोथरूड येथे वारी, विमाननगर येथे मनमौजी, साळुंके विहार येथे फॅट कॅट्स कॅफे असे सहा-सात बुक कॅफे शहराच्या विविध भागांत आहेत. सुरुवातीला बुक कॅफे या वेगळ्या कल्पनेमुळे त्या विषयी कुतूहल निर्माण झाले. मात्र, आता ही कल्पना रूढ होताना दिसत आहे. आता डेक्कन परिसरात ‘वर्ड्स अँड सिप्स’ आणि बोका द बुक कॅफे हे दोन नवे बुक कॅफे सुरू झाले आहेत.

‘कॅफेमध्ये येणाऱ्या तरुणांचे प्रमाण पाहता पुस्तके वाचण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे असे वाटत नाही. अनेकांना पुस्तके विकत घेऊन वाचण्यापेक्षा कॅफेमध्ये वाचत बसणे सोयीचे वाटत असावे. शांत वातावरण असल्याने त्यांना मनाप्रमाणे वाचता येते. कॅफे आहे म्हणून खाद्यपदार्थ किंवा पेयांचे जास्त प्रकार देण्यापेक्षा आमचा भर पुस्तकांवर आहे. पुढील काळात विविध उपक्रमांची जोड देण्याचाही प्रयत्न आहे,’ असे बोका द बुक कॅफेच्या अक्षता डहाणूकर आणि साईश राणे यांनी सांगितले.

तर प्रदीपकुमार तांबके, एजाज शेख आणि देविदास गवाणे या रिडर्स क्लब ही अभ्यासिका चालवणाऱ्या तीन मित्रांनी मिळून वर्ड्स अँड सिप्स हा कॅफे सुरू केला. रिडर्स क्लब या नावामुळे वाचन कट्टा आहे का, अशी अनेक लोक चौकशी करायचे. आरामात बसून कितीही वेळ वाचता येईल, असा बुक कॅफे सुरू करण्याची कल्पना त्यातून पुढे आली. सुरुवातीला किती लोक येतील अशी साशंकता होतीच. मात्र, आता विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठही येतात. शांतपणे हवा असलेले चित्रकारही येऊन काम करत बसतात. कविता वाचन, अभिवाचन असे छोटेखानी उपक्रमही केले जात आहेत. अल्पावधीत मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रोत्साहन मिळाले असून, येत्या काळात बुक कॅफेची शाखा, फ्रँचायझी सुरू करण्याचाही विचार असल्याची माहिती त्यांनी दिली.

..म्हणून प्रतिसाद

शांत वातावरण, मराठी, हिंदी, इंग्रजीमधील वैविध्यपूर्ण पुस्तके आणि सोबत चहा, कॉफी मिळत असल्याने तरुणांचा या कॅफेंकडे कल वाढतो आहे. पुस्तकांबरोबरच वायफायची सुविधाही येथे दिली जाते. त्यामुळे नोकरदार तरुण-तरुणीही या ठिकाणी येतात.