जयदेव गायकवाड (आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते)

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

अमेरिकेतील निग्रो चळवळीतून दलित साहित्याला प्रेरणा मिळाली. दलित पँथर चळवळीमध्ये काम केल्यामुळे समाजातील उपेक्षितांचे प्रश्न समजले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्यावर पडला आणि त्यांच्याप्रमाणेच शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजे या जाणिवेतून माझ्यासारखा कार्यकर्ता घडला. आता आमदार म्हणून काम करताना राज्यातील युवा पिढी वाचनाने समृद्ध आणि विवेकी व्हावी या उद्देशातून ग्रंथालयामध्ये ग्रंथसंपदा वाढविण्याच्या उद्देशातून आमदार निधीचा विनियोग करता आला.

माझी आई (जनाबाई) खेडय़ातील आणि अशिक्षित. पण, ती नेहमी म्हणायची, शिकलेला माणूस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे राजगुरुनगरच्या निमगाव दावडी या एका छोटय़ाशा खेडय़ात असूनही मला डॉ. आंबेडकर या व्यक्तिमत्त्वाविषयी लहानपणापासूनच उत्सुकता होती. अभ्यास करून खूप मोठे व्हायचे, हे माझ्या मनावर आईने आणि शाळेतील शिक्षकांनी बालवयापासूनच िबबविले. त्यामुळे निमगावला असताना सोनावणे सर आणि माध्यमिक शिक्षणाकरिता दावडीला असताना ओहोळ सरांनी सांगितलेल्या डॉ. आंबेडकरांच्या गोष्टी माझ्या मनात घर करीत होत्या.

शिक्षण घेऊन मोठे होण्याची ओढ मला निमगाव आणि दावडीदरम्यान ३ ते ४ किलोमीटर अंतराच्या पायी प्रवासातच लागली. प्रवासादरम्यान मी एकटाच असल्याने कविता म्हणायचो, पाठांतर करायचो. त्यामुळे वाचलेल्या गोष्टींचे चिंतन करण्याची सवय मला लहानपणीच लागली. डॉ. आंबेडकर आणि राज्यघटना हे माझ्या जिव्हाळय़ाचे आणि आवडीचे विषय. त्याविषयी मी इतके खोलवर वाचन केले की मलादेखील आता अनेक पुस्तके आणि संदर्भग्रंथ पटकन आठवणार नाहीत. परंतु डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी मला राज्यघटनेच्या दुनियेत रमण्यास प्रवृत्त केले, हेही तितकेच खरे आहे. डॉ. आंबेडकर जेव्हा इंग्लंडहून मुंबईत आले, तेव्हा त्यांचा पहिला सत्कार माझ्या वडिलांनी म्हणजेच मारुती गायकवाड यांनी केला होता, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. वाचनातून योग्य-अयोग्य याची जाणीव आपल्याला होते. साहित्यातून उभ्या राहिलेल्या चळवळीतून समाजपरिवर्तन होते, त्यामुळे प्रत्येकाने केवळ वाचनच नाही, तर चिंतन करायला हवे.

शिक्षणासाठी १९६०च्या सुमारास मी पुण्यामध्ये आलो. नाना पेठेतील महात्मा जोतिराव फुले हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीनंतरचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी आम्ही बंडगार्डन परिसरात राहायला होतो. तेथून पुणे नगर वाचन मंदिरात माझा मित्र विजय जाधव याच्यासोबत वाचनासाठी कधी चालत तर कधी सायकलवरून येत असे. भालचंद्र खांडेकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या कादंबऱ्या आम्ही याच काळात वाचल्या. पुढे वाडिया महाविद्यालयामध्ये असताना वाचनाची आवड चांगल्या पद्धतीने जोपासली गेली. जागतिक पातळीवर वाङ्मयामध्ये नोबेल पारितोषिक दिले जाते हे मला समजले आणि मी त्याविषयी माहिती शोधायला लागलो. त्याकरिता वाडिया महाविद्यालयाच्या ग्रंथालयासह किंग एडवर्ड लायब्ररीचा सभासद झालो. जवळपास आठ ते दहा वष्रे दररोज सायंकाळी दीड तास वेगवेगळय़ा मराठी, इंग्रजी पुस्तकांचे वाचन असा दिनक्रम सुरू होता. त्यामुळे माझ्या वाचनप्रवासाला खऱ्या अर्थाने येथूनच सुरुवात झाली.

दलित पँथर चळवळीला १९७२च्या सुमारास बहर आला. चळवळीचे पुण्यातील नेतृत्व माझ्याकडे होते. त्या वेळी नामदेव ढसाळ, दया पवार यांनी काढलेली साहित्यिक अनियतकालिके माझ्या वाचनात आली. चळवळीविषयीची प्रेरणा आणि विचार अधिक समृद्ध झाला, तो अमेरिकेतील निग्रो साहित्यामुळे. ते साहित्य शोधून वाचताना मी झपाटून गेलो. रिचर्ड राईट्स, जेम्स बाल्डविन, माल्कन एक्स यांच्या लेखनापासून आपल्याकडील दलित साहित्याने प्रेरणा घेतली. ‘फायर टू द नेक्स्ट डोअर’, ‘इन्विझिबल मॅन’ यांसारख्या पुस्तकांनी मी भारावून गेलो होतो. अमेरिकेतील काळा-गोरा असा संघर्ष मिटविण्याचे काम किंबहुना या साहित्यानेच केले असावे. अमेरिकेतील ही साहित्याची चळवळ भारतातही गरजेची होती. त्यामुळे त्याकरिता मी अधिकाधिक साहित्य वाचू लागलो.

भारताच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ही डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेत आहेत. त्यामुळे त्यांची दूरगामी भूमिका, विचार आणि चिंतन जाणून घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो. त्याकरिता महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर चळवळ याविषयी माहिती गोळा करणे सुरू झाले. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे बाबासाहेबांचे सामूहिकरीत्या आम्ही वाचलेले पहिले पुस्तक. त्यासोबतच ‘शोध साहित्याचा’, ‘भारतातील जाती’, ‘जातींचा विध्वंस’, ‘अस्पृश्य मूळचे कोण’ अशी अनेक छोटीमोठी पुस्तके मी वाचत होतो. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार माझ्या मनात खोलवर रुजत होते. जेव्हा मी कायद्याचा अभ्यास सुरू केला, तेव्हा घटनात्मक पेचप्रसंगांविषयी अनेक प्रश्न माझ्या मनात आले. त्यामुळे ‘कॉन्स्टिटय़ूशनल असेम्ब्ली डिबेट्स’चे पाच खंड मी दिल्लीतून मिळविले. घटना समितीत डॉ. आंबेडकरांनी केलेली भाषणे आणि प्रत्येक कलमावर झालेली चर्चा जाणून घेण्याची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे ‘रायटिंग्ज अँड स्पिचेस ऑफ डॉ. आंबेडकर’ हे १८ खंड मी मिळविले. आजही ते माझ्या बुकशेल्फमध्ये आहेत.

युरोपियन लेखकांची मार्क्‍सवाद, समाजवादाविषयी अनेक पुस्तके मी वाचत होतो. त्यामुळे लोकशाही, राज्यघटना आणि राजकीय परिस्थितीविषयी साहित्य गोळा करण्याचा छंद मला लागला. पुण्यासह विविध ठिकाणी भरलेल्या या ग्रंथप्रदर्शनांमध्ये आजही मी आवर्जून जातो आणि याविषयासंदर्भात पुस्तकांची खरेदी करतो. समाजाच्या वेदना आणि व्यथा ज्यांना समजल्या अशा रामनाथ चव्हाण, दया पवार, नामदेव ढसाळ, माधव कोंडविलकर, यशवंत मनोहर, गंगाधर पानतावणे यांचे साहित्य मला विशेष भावले. ‘इथे मरण स्वस्त होते’, ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या बाबुराव बागूल यांच्या पुस्तकांनी माझ्या विचारात भर पडत होती. डॉ. रावसाहेब कसबे, शरद पाटील हे माझे आवडते लेखक. याशिवाय डॉ. आंबेडकर यांचा राज्यघटनेविषयीचा जिवंत दस्तऐवज गोळा करण्याकरिता मी अनेक पुस्तके ढुंढाळली.

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची चरित्रे वाचून काढली. वाचनासोबतच लेखनही गरजेचे आहे या भूमिकेतून ‘संविधान सभेत डॉ. आंबेडकर’ आणि ‘जातिभेदाचे अंत:प्रवाह’ या दोन पुस्तकांचे लेखन माझ्या हातून झाले. आजच्या तरुण पिढीपर्यंत साहित्याचे विश्व पोहोचावे, याकरिता आमदार झाल्यानंतर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २०१५-१६ मध्ये आमदार निधीतून ७५ लाख रुपये देऊन राज्याच्या ३५ जिल्हय़ांमध्ये पुस्तके भेट दिली. यामुळे पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, अकोले, उस्मानाबादसह अनेक ठिकाणच्या ग्रंथालयांमध्ये ग्रंथसंपदा वाढली आहे. कायमस्वरूपी राहणारा हा ठेवा आजच्या पिढीला नक्कीच वैचारिक प्रगल्भता देईल यात शंका नाही.