मुलगाच व्हावा यासाठी विशिष्ट पूजा व मंत्र सांगणारा लेख ‘ब्रह्मलिखित’ मासिकात प्रसिद्ध झाल्याच्या प्रकरणात मासिकाचे संपादक आदिनाथ साळवी यांची चौकशी करण्याचे आदेश राज्य कुटुंब कल्याण विभागाने दिलले असतानाही पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत चौकशी कतरून सात दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश असताना पालिकेने दोन महिने उलटत आले तरी चौकशी पूर्ण केलेली नाही.
गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र लिंगनिवड प्रतिबंध अधिनियम (पीसीपीएनडीटी) २००३ नुसार अशा पद्धतीने लिखाण करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. ब्रह्मलिखित मासिकाच्या ऑगस्ट २०१३ च्या अंकामध्ये पान क्रमांक ३४ वर ज्योतिष नाना कोंडे यांनी पुत्रप्राप्तीसाठी विशिष्ट मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास हमखास पुत्रप्राप्ती होईल, असे लिहले होते. ‘हमखास मुलगाच होईल’ याबाबत लिखाण केल्याचे आढळून आल्यास संबंधित लेखक, प्रकाशक, मुद्रक व विक्रेते यांच्याविरुद्ध कारवाईची तरतूद पीसीपीएनडीटी कायद्यामध्ये आहे. ब्रह्मलिखित मासिकाचे मालक, संपादक, मुद्रक व प्रकाशक आदिनाथ साळवी हे आहेत.
‘लेक लाडकी’ अभियानाचे जिल्हा समन्वयक गणेश बोऱ्हाडे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी १३ सप्टेंबर २०१३ रोजी कुटुंब कल्याण विभागातील पीसीपीएनडीटी कक्षाकडे लेखी तक्रार केली. कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसांच्या आत कारवाई करून त्याचा अहवाल कुटुंब कल्याण विभागाकडे पाठविण्याचे आदेश दिले. महापालिकेकडे याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन यावर तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते. कायद्यातील तरदूत अस्पष्ट असल्यास अपवादात्मक परिस्थितीमध्ये विधी विभागाचा सल्ला घेतला जाणे अपेक्षित आहे. मात्र, पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदी स्पष्ट असतानाही आरोग्य विभागाकडून या संबंधातील तक्रारींवर विधी विभागाचा सल्ला मागवून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप बोऱ्हाडे यांनी केला आहे.
या गुन्ह्य़ाशी माझा संबंध नाही- साळवी
‘‘ब्रह्मलिखित मासिकात प्रसिद्ध झालेला लेख नाना कोंडे यांनी लिहिलेला आहे. पीसीपीएनडीटीच्या कलम २२ हे जाहिरात संदर्भात आहे. मासिकामधील लेखात म्हटलेल्या मतांशी संपादक सहमत राहणार नाही, असा उल्लेख मासिकात आहे. त्यामुळे माझा या गुन्ह्य़ाशी थेट संबंध नाही. त्याचबरोबर घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने मत व्यक्त करणे हा गुन्हा होत नाही. याबाबत माझा महापालिकेच्या आरोग्य विभागाला अभिप्राय दिला आहे,’’ असे आदिनाथ साळवी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2013 रोजी प्रकाशित
ब्रह्मलिखित मासिक, संपादक आदिनाथ साळवी यांची चौकशी करण्यात पालिकेकडून टाळाटाळ
ज्योतिष नाना कोंडे यांनी, पुत्रप्राप्तीसाठी विशिष्ट मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास हमखास पुत्रप्राप्ती होईल, असे ब्रह्मलिखित मासिकात लिहिले होते.

First published on: 19-12-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahma likhit adinath salvi crime pmc