सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत या वर्षीही महाराष्ट्रानेच बाजी मारली असून अकोला जिल्ह्य़ातील अकोट येथील गौरव दीपक श्रावगी हा विद्यार्थी ६६.७५ टक्के गुण मिळवून देशात पहिला आला आहे. सीए परीक्षेचा निकाल या वर्षी ३.११ टक्के लागला आहे.
सीए आणि कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट (सीपीटी) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत अकोट येथील गौरव श्रावगी हा विद्यार्थी देशात पहिला आला असून त्याला ८०० पैकी ५३४ गुण मिळाले आहेत. या परीक्षेत गौरव पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. दिल्ली येथील मृदू गर्ग ही विद्यार्थिनी ६६.२५ टक्के गुण मिळवून देशात दुसरी आली आहे, तर कोलकाता येथील अक्षय लोसल्का हा विद्यार्थी ६५.५० टक्के गुण मिळवून देशात तिसरा आला आहे.
सीए फायनलची परीक्षा नोव्हेंबर २०१३ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेला दोन्ही ग्रुपसाठी देशभरातून ३२ हजार ५३६ विद्यार्थी बसले होते, त्यातील १ हजार १३ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सीए फायनलचा फक्त ग्रुप ‘क ’ परीक्षेचा निकाल ५.६७ टक्के लागला आहे. ग्रुप ‘क’ परीक्षा ५१ हजार ७२८ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील २ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रुप ‘क ’ परीक्षेचा निकाल ७.३५ टक्के लागला असून ५४ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यातील ४ हजार २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट (सीपीटी) परीक्षेचा निकाल ३७.६१ टक्के लागला आहे. या परीक्षेला १ लाख १३ हजार ५५३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४२ हजार ७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
‘‘ मिळालेल्या यशाने अर्थातच आनंद झाला. मला दिल्लीचे शिक्षक प्रवीण शर्मा, संजय अग्रवाल, विनोद गुप्ता, पवन गवकर, सुरभी बन्सल तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे कर आकारणी (टॅक्सेशन) क्षेत्रात काम करायचे आहे.’’
– गौरव श्रावगी
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘सीए’च्या परीक्षेत अकोल्याचा गौरव श्रावगी देशात पहिला
सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत या वर्षीही महाराष्ट्रानेच बाजी मारली असून अकोला जिल्ह्य़ातील अकोट येथील गौरव दीपक श्रावगी हा विद्यार्थी ६६.७५ टक्के गुण मिळवून देशात पहिला आला आहे

First published on: 16-01-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ca cpt exam gaurav shravagi