लोकसभा निवडणुकीसाठी पुण्याचा उमेदवार निश्चित करण्याबाबत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचा घोळ अद्यापही सुरू आहे. वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी तीन-तीन प्रबळ दावेदार असून त्यांचे समर्थक करत असलेल्या प्रयत्नांमुळेच उमेदवारी जाहीर होण्यास विलंब लागत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमदेवारीबाबत पक्षाध्यक्ष राजनाथसिंह हेच निर्णय घेतील असे पक्षाच्या केंद्रीय निवड समितीमध्ये निश्चित करण्यात आले असले, तरी शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट आणि प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्यातील चुरशीमुळे निर्णय लांबत आहे. शिरोळे यांच्या समर्थकांचे गोपीनाथ मुंडे यांच्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत, तर बापट यांनीही दिल्लीत मोर्चेबांधणी केली आहे. जावडेकर यांच्यासाठी राजीवप्रताप रुडी आणि अन्य काही केंद्रीय नेते प्रयत्नशील आहेत.
काँग्रेसचा उमेदवार निश्चित करण्यातही पक्षीय राजकारण आडवे येत आहे. आमदार विनायक निम्हण, युवक काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि आमदार मोहन जोशी यांच्याकडून उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून राज्य तसेच केंद्रीय स्तरावरील नेतेही पुण्याच्या निर्णयात लक्ष घालत असल्यामुळे निवड लांबणीवर पडली आहे.
दोन्ही पक्षांचे नेते प्रतिस्पर्धी पक्ष कोण उमेदवार देतो त्यावर आपला उमेदवार ठरवणार असल्याचीही चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पक्षाला स्वत:चाच उमेदवार निश्चित करता आलेला नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी कोण उमेदवार देणार आणि ते पाहून आपला उमेदवार ठरवू असे राजकारण तूर्त तरी नाही. दोन्ही पक्ष आधी स्वत:चाच उमेदवार निश्चित करतील आणि मग निवडणुकीची तयारी सुरू होईल, असे अनुभवी कार्यकर्त्यांचे मत आहे.