डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना देण्यासाठी औषधांचा साठा करावा का, या मुद्दय़ावरून औषधविक्रेत्यांची संघटना आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा वाद सुरू झाला आहे. औषधविक्रेत्यांनी आपल्याला औषधे पुरवणेच बंद केले असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. औषधविक्रेत्यांनी मात्र ही माहिती फेटाळली असून केवळ आणीबाणीपुरतीच औषधे डॉक्टरांनी ठेवावीत असे त्यांचे म्हणणे आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात औषधविक्रेत्यांच्या संघटनेने आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. काही डॉक्टर वितरकांकडून सवलतीच्या दरांमध्ये औषधे घेतात आणि रुग्णांना औषधे विकतात अशी तक्रार त्यांनी केली. या घटनेनंतर औषधविक्रेत्यांनी डॉक्टरांना औषधे पुरवणे बंद केले असल्याची माहिती आयएमएचे पुण्याचे अध्यक्ष डॉ. अरुण हळबे यांनी दिली. शहरातील काही डॉक्टरांकडून आयएमएकडे औषधविक्रेते आपल्याला औषधे पुरवत नसल्याच्या तक्रारी येत आहेत असे त्यांनी सांगितले.
डॉ. हळबे म्हणाले, ‘‘कायद्यानुसार डॉक्टरांनी औषधांचा किती साठा करावा यावर बंधन नाही. मात्र जेवढी औषधे डॉक्टरांकडून वापरली गेली त्याचे समर्थन डॉक्टरला औषध निरीक्षकांकडून होणाऱ्या तपासणीच्या वेळी सादर करता यायला हवे. डॉक्टरांनी औषधांचा किती साठा करावा यावर बंधने घालण्याचा अधिकार औषधविक्रेत्यांच्या संघटनेस नाही. या बाबतीत आयएमएने ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रक्ट’ला (सीएपीडी) निषेधाचे पत्र पाठवले आहे. छुपेपणाने औषधे विकणाऱ्या डॉक्टरांबाबत आयएमएला अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. पण औषधविक्रेत्यांनी अशा डॉक्टरांची नावे व त्याबाबतचे पुरावे आम्हाला दिले तर आयएमए त्याबद्दल एफडीएकडे जाण्यास तयार आहे.’’
औषधविक्रेत्यांनी डॉक्टरांना औषधे पुरवणे बंद केलेले नाही, असे ‘सीएपीडी’चे सचिव विजय चंगेडिया यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘शेडय़ूल ‘के’नुसार डॉक्टरांना आणीबाणीच्या परिस्थितीत लागतील तेवढीच औषधे त्यांनी ठेवावीत, अधिक साठा करू नये अशी विनंती आम्ही आयएमएला केली होती. डॉक्टर औषधे विकत असल्याच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होता. डॉक्टरांनी औषधांचा व्यवसाय करू नये.’’
डॉक्टरांचे म्हणणे काय?
– मधुमेह, उच्च रक्तदाब अशी काही औषधे, स्टिरॉइड्स, प्रतिजैविके अशी औषधे डॉक्टरांना अनेकदा रुग्णांना द्यावी लागतात.
– रात्री उशिरा आलेले रुग्ण किंवा आणीबाणीच्या वेळी आलेले रुग्ण अशांना औषधे देण्यासाठी औषधांचा साठा करावा लागतो.
एफडीएचा नियम काय?
औषध विभागाचे सह आयुक्त बा. रे. मासळ म्हणाले, ‘‘शेडय़ूल ‘के’नुसार रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर स्वत:च्या रुग्णांना देण्यासाठीच्या औषधांचा साठा करू शकतात. त्यांनी किती साठा करावा यावर बंधन नाही. पण डॉक्टर या औषधांची विक्री करू शकत नाहीत. डॉक्टरांनी केवळ त्यांच्याकडेच येणाऱ्या रुग्णांना औषध देणे अभिप्रेत असून औषधांच्या वितरणाचा तपशीलही नोंदवायला हवा. केवळ परवानाधारक औषधविक्रेत्यांकडूनच त्यांनी औषधे खरेदी करायला हवीत.’’
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2014 रोजी प्रकाशित
औषधांचा साठा करण्याच्या मुद्दय़ावरून डॉक्टर आणि औषधविक्रेत्यांचा वाद सुरू
डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना देण्यासाठी औषधांचा साठा करावा का, या मुद्दय़ावरून औषधविक्रेत्यांची संघटना आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा वाद सुरू झाला आहे.

First published on: 25-12-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Capd doctor medicine ima