scorecardresearch

पर्यटनस्थळी आता कॅराव्हॅनचाही पर्याय; वैयक्तिक वापरासाठी राज्यातही परवानगी

राज्यातील पर्यटनस्थळी निवासासाठी आता वैयक्तिक कॅराव्हॅन वापरता येणार आहे. अशा कॅराव्हॅनना पर्यटनस्थळी नेऊन त्यामध्ये निवास करण्यासाठीची परवानगी पर्यटन विभागाकडून देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

पर्यटनस्थळी आता कॅराव्हॅनचाही पर्याय; वैयक्तिक वापरासाठी राज्यातही परवानगी

पुणे : राज्यातील पर्यटनस्थळी निवासासाठी आता वैयक्तिक कॅराव्हॅन वापरता येणार आहे. अशा कॅराव्हॅनना पर्यटनस्थळी नेऊन त्यामध्ये निवास करण्यासाठीची परवानगी पर्यटन विभागाकडून देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यात तीन कॅराव्हॅनना परवानगी देण्यात आली आहे. परदेशांप्रमाणे देशातील गुजरात, केरळ या राज्यांत कॅराव्हॅन धोरण राबविण्यात आले आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही कॅराव्हॅन किंवा कॅम्पर व्हॅनच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यात येत आहे.

राज्यात निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक किल्ले, टेकडय़ा, दुर्गम भाग, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी आणि धरणे अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. यातील अनेक ठिकाणी पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील परिसर असल्याने पक्के बांधकाम करता येत नाही. परिणामी हॉटेल वा निवासस्थानांच्या सोयी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

याबाबत बोलताना पुणे विभागाच्या पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर-दातार म्हणाल्या, ‘पर्यटन संचालनालयाकडे कॅराव्हॅन आणि कॅराव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक आहे. या पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा; तसेच खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळणार आहे. कॅराव्हॅन पार्कमध्ये मूलभूत सोयीसुविधांनीयुक्त अशा जागेवर ही पार्क उभी करून मुक्काम करता येईल. यामध्ये लहान मोठय़ा आकाराच्या कॅरॅव्हॅन उभ्या करता येतील. असे पार्क खासगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक उभारू शकणार आहेत. वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा; तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीज जोडणी असेल. मात्र, सध्या राज्यात कॅराव्हॅन पार्क उपलब्ध नसल्याने परवानगी देण्यात आलेल्या तीन कॅराव्हॅन राज्यातील कृषी पर्यटन केंद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) निवासस्थाने किंवा खासगी हॉटेल यांच्या परिसरातच उभी करावी लागणार आहेत. कारण या व्हॅनमध्ये निवास करणाऱ्यांची सुरक्षितता आणि या व्हॅनमधून तयार होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट संबंधित हॉटेलच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे. पर्यटन विभागाकडून कॅम्पर व्हॅन म्हणून परवानगी घेतलेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाचा कर आणि व्यावसायिक वाहनांना द्याव्या लागणाऱ्या करातून माफी देण्यात आली आहे.’

नवे काय? राज्यभरातून तीन कॅराव्हॅनना पर्यटन विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. ही वाहने कृषी पर्यटन केंद्र, एमटीडीसी निवासस्थाने किंवा खासगी हॉटेल यांच्या परिसरात उभी करता येणार आहेत.

कसे मिळवाल?

कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅराव्हॅन; तसेच हायब्रीड कॅराव्हॅन पार्कची नोंदणी पर्यटन संचालनालयाच्या  www.maharashtratourism.gov.in संकेतस्थळावर करता येईल. अधिक माहितीसाठी ०२०-२९९००२८९ किंवा  ddtourisam.pune-mh@gov.in यावर ई-मेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फायदा काय? कौटुंबिक सहलींचे आयोजन, हॉटेल्स आणि रिसॉर्ट या पारंपरिक निवास व्यवस्थेपेक्षा वेगळा अनुभव, ना विकास क्षेत्राचा योग्य वापर, दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Caravans tourist destinations allowed personal accommodation ysh

ताज्या बातम्या