पुणे: नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी एका तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला देऊन भोंदूगिरीचा प्रकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी उघडकीस आला. तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी वृषाली संतोष ढोले-शिरसाट (वय ३९, रा. वंशज गार्डन, पाषाण), माया राहुल गजभिये (वय ४५, रा. विठ्ठलनगर, पाषाण), सतीश चंद्रशेखर वर्मा (वय ३३, रा. गणेश हाॅस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध जादूटोणा कायदा कलम, तसेच फसवणूक, धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाषाण भागात एक महिला आणि तिचे साथीदार भोंदूगिरी करत असल्याची माहिती अंनिसचे कार्यकर्ते विशाल विमल यांना मिळाली होती. त्यानंतर विशाल आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली.

हेही वाचा… महसूल आणि भूमी अभिलेख विभागांचा मोठा निर्णय ; आता महानगरांलगतच्या जमिनी खरेदी-विक्रीतील गैरप्रकारांना बसणार चाप

अंनिसचे कार्यकर्ते पोलिसांसह पाषाण परिसरात गेले. आरोपी वृषाली आणि साथीदारांनी गुरुदत्त कन्सल्टन्सी ही संस्था सुरू केली होती. त्यांनी कार्यकर्त्यांना एक हजार रुपये भरण्यास सांगितले. कार्यकर्ते विशाल कार्यालयातील एका खोलीत गेले. वृषालीने त्यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. वृषाली फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस खोलीत गेले. पाेलिसांनी पंचनामा करून जादूटोण्याचे साहित्य जप्त केले.

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने एक तरुण नैराश्यात होता. समाजमाध्यमातील जाहिरात पाहून तरुण तेथे गेला होता. दैवी शक्ती असल्याची बतावणी करून आरोपी वृषाली आणि साथीदारांनी तरुणीकडून वेळोवेळी दीड लाख रुपये उकळले. वृषालीने पाय धुतलेले पाणी तरुणाला प्यायला दिले. तिने तरुणाचे मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक निरीक्षक संभाजी गुरव, उपनिरीक्षक विद्या पवार आणि पथकाने कारवाई केली.

Story img Loader