करोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या व राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपासून राज्यात दारू विक्रीस देण्यात आलेल्या परवानगीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. दारू विक्री आपल्या सर्वांसाठी घातक आहे. मुंबई, पुणे ही शहरं करोनाची हॉटस्पॉट ठरत आहेत. तर राज्यातही दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात एक विशेष सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी करोना लढाईत प्रत्यक्ष काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि पुण्यातील एक हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार अशा एकूण जवळपास तीन हजार जणांना टप्याटप्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील  बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश पांडे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले,  राज्यातील अनेक भागात दारूच्या दुकानांबाहेर,  मद्यप्रेमींच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे अजिबात पालन केले जात नाही.   त्यामुळे दारु विक्रीतून मिळणारे उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन सामाजिक अडचणी लक्षात घेता, हे बंद करायला हवे. तसेच, दारु ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे मुंबई, पुणे करोनाचे हॉटस्पॉट असताना  या ठिकाणी व संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये, असेही त्यांनी म्हटले.

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा –
भारतीय जनता पार्टीने लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्यांना पुण्यामध्ये आठ दिवस पुरेल इतके 2 लाख 30 हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले आहेत. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि परिस्थिती लक्षात घेता. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. तर ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर गणपती उत्सव चालतो, त्यांचे घर कसे चालेल हे आपण पहायला हवे, असेही त्यांनी सांगितले.