पंतप्रधान रोजगार योजनेतून कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने तीन आरोपींनी कर्वेनगर येथील एका तरुणीची व उंड्रीतील तरुणाची सुमारे साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कोंढवा आणि अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल चौधरी, मनोज श्रीवास्तव आणि एक महिला या तिघांवर याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गजानन वाघ (वय ३१, रा. अतुलनगर, ऊंड्री) यांनी वानवडी, तर मथाली चन्नावर (वय २७, रा. कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन वाघ यांना विशाल चौधरी व त्याच्या साथीदारांनी मोबाईलवर संदेश पाठवून पंतप्रधान रोजगार योजनेतून २२ लाख रूपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी कागदपत्रेही मागवून घेतली. कर्जासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून साडेपाच लाख रुपये बँकेच्या खात्यावर भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर पुढे आरोपींनी संपर्कच न केल्याने फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला.
दुसऱ्या प्रकरणात मथाली चन्नावर यांना व्यवसायासाठी कर्ज हवे होते. त्यांना ई-मेलवर केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून व्यवसायासाठी २५ लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या प्रकरणातही प्रक्रिया शुल्क म्हणून बँकेत रक्कम भरायला लावली. त्यानंतर चन्नावर यांच्याशी कोणताही संपर्क करण्यात आला नाही.