स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ भाजपबरोबर एकत्रित लढणार
पिंपरीः पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे लढविणार आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत घेतलेल्या संयुक्त बैठकीतून दिले आहेत. स्थानिक निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरमहा जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत.
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली. पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजित विकासकामांबाबत मुख्यमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेना व भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बारणे यांच्यासह माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, राहुल कुल, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, पुणे पालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुणे: ओला दुष्काळ, पूरस्थितीत सरकारचे अस्तित्वच नाही; धनंजय मुंडे यांची टीका
या बैठकीत पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. राज्य सरकारच्या विविध योजना, निधी महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मिळावा त्यादृष्टीने सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे बैठकीत सांगण्यात आले. याबाबत बारणे म्हणाले,की पुणे जिल्ह्यात कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. जिल्ह्यातील बारामतीचा विकास झाला. त्या तुलनेत इतर भागांचा विकास झाला नाही. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पुणे, पिंपरी पालिकेची सत्ता नागरिकांनी भाजपकडे दिली. पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून, त्यामध्ये रणनीती ठरविली जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र आल्यानंतर त्यांच्याविरूद्ध लढण्यासाठी काय व्यूहरचना करायची, यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
पवार विरोधकांची एकजूट
पुणे जिल्ह्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत ज्या नेत्यांनी हजेरी लावली, त्यांच्यात ‘पवार विरोधक’ हे समान सूत्र होते. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून निवडणूक लढवली होती. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभेत पराभव केला. शिरूर लोकसभेच्या राजकारणात माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, इंदापूरच्या राजकारणात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, तर पुरंदरच्या राजकारणात माजी मंत्री विजय शिवतारे हे पवार विरोधक म्हणून ओळखले जातात. अजित पवारांच्या ताब्यात असलेली पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यात आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.