खेडमधील बालरुग्णाची रोज मृत्यूशी झुंज
पुण्याजवळील खेडमधील राजू (नाव बदलले आहे) हा साडेतीन वर्षांचा मुलगा. वडील कामगार. घरची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची. जन्मानंतर चौथ्या महिन्यात ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’तून (आरबीएसके) झालेल्या तपासणीत या मुलाला हृदयाची समस्या असल्याचे समजले. राजूची जोखमीची शस्त्रक्रिया ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’तून होण्याची आशा त्याच्या पालकांना होती, पण शस्त्रक्रियेपूर्वी त्याची ‘कार्डिअ‍ॅक कॅथ’ ही चाचणी करणे गरजेचे होते. या चाचणीसाठी पैसे कुठून आणायचे, या प्रश्नाने राजूच्या शस्त्रक्रियेला पहिला खोडा बसला आणि त्यानंतर ‘अतिजोखमीची’ म्हणून शस्त्रक्रिया जी अडली ती अजूनही झालेली नाही.
गेली तीन वर्षे राजूची प्रकृती हळूहळू खालवते आहे. आता तर त्याचे ओठही निळे पडतात. मार्चमध्ये पुण्यातील एका रुग्णालयात आरबीएसके कार्यक्रमातून येणाऱ्या बालकांना ‘कार्डिअ‍ॅक कॅथ’ सवलतीच्या दरात- ६ हजारांत करून मिळत होती व राजूला त्यासाठी नेण्यात आले. परंतु आता त्याची प्रकृती इतकी बिघडली आहे की, चाचणीसाठी भूल दिल्यानंतर तो परत शुद्धीवर येऊ शकेल की नाही याची डॉक्टरांना शाश्वती वाटत नाही. हे ऐकून घाबरलेले राजूचे पालक त्याला चाचणी न करताच घरी घेऊन गेले. त्याची शस्त्रक्रिया अतिजोखमीची असल्यामुळे आता ती होऊच शकणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ही केवळ राजूची गोष्ट नाही. त्याच्यासारख्या इतरही काही बालकांच्या शस्त्रक्रिया अडून राहिल्याचे समोर आले आहे. गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रिया वेळेत होण्याबाबत शासकीय स्तरावरून काही कायमस्वरूपी मार्ग निघणार का, शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासण्या तसेच शस्त्रक्रियेशी निगडित असलेले इतर काही खर्च या बालकांना करता यावेत यासाठी काही वेगळी सोय निर्माण होणार का, हे प्रश्न या बालकांच्या करुण कथांमुळे उभे राहिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रखडलेल्या शस्त्रक्रियांबाबत लक्ष घालू’
‘आरबीएसके’तील अडलेल्या हृदयशस्त्रक्रियांबाबत आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, ‘‘एएसडी-व्हीएसडी क्लोजर’ प्रकारच्या शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेतून होतात. परंतु ‘ओपन हार्ट’सारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालये जोखीम घ्यायला तयार नसतात. परंतु त्या पुण्यात जहाँगीर रुग्णालय व मुंबईतील जे. जे. रुग्णालयात केल्या जातात. रखडलेल्या शस्त्रक्रियांबाबत मी जिल्हा शल्यचिकित्सक व आरबीएसके समन्वयकांशी बोलते. त्यातून काही मार्ग काढता येईल.’

‘‘कार्डिअ‍ॅक कॅथ’ मोफत व्हावी’
‘महाराष्ट्र राज्य आरबीएसके डॉक्टर्स व कर्मचारी संघटने’तर्फे २ मे रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांना आरबीएसकेतील बालरुग्णांची ‘कार्डिअ‍ॅक कॅथ’ ही तपासणी मोफत होण्याबाबत निवेदन दिले आहे. त्यात खेड तालुक्यातील ७ मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया न झाल्याबाबत उल्लेख केला असून गेल्या २-३ वर्षांत या मुलांच्या शस्त्रक्रियांबाबत वेळोवेळी प्रस्ताव जमा केल्याचे म्हटले आहे. ‘वेळेवर चाचणी होऊ न शकल्याने हृदयविकाराची तीव्रता वाढून तो अतिजोखमीचा होतो आणि मुंबईसारख्या ठिकाणी मोठय़ा रुग्णालयात मूल घेऊन जाण्यास पालकांचे धाडस होत नाही. त्यासाठी ‘कार्डिअ‍ॅक कॅथ’ ही तपासणी मोफत होण्याबाबत प्रयत्न व्हावेत,’ असेही संघटनेने म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child patients heart surgery stuck from three years
First published on: 03-05-2016 at 01:20 IST