सामान्य माणूस आपल्या डोळ्यांनी चित्र पाहून त्याचा आनंद लुटू शकतो. पण, ज्यांना दृष्टी नाही अशा व्यक्तींनीही चित्रे अनुभवावीत हा उद्देश ठेवून चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी यावर उत्तर शोधले आहे. चित्रावर लिहिलेला ब्रेल लिपीतील आशय आणि ‘हेडफोन’ लावल्यावर बोलणारी व्यक्तिरेखा अशा स्पर्शज्ञानातून दृष्टिहीनांसाठी चित्रामागची सौंदर्यसृष्टी त्यांनी ‘डोळस’ केली आहे. त्यामुळेच दृष्टिहीन व्यक्तीही चित्र पाहण्याचा आनंद लुटणार आहेत.
‘आपल्या कलेचा समाजाला उपयोग होत नाही तोपर्यंत चित्रप्रदर्शन भरवायचे नाही आणि कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असे मी ठरविले होते. अभिनव कला महाविद्यालयातून फाईन आर्ट ही पदविका संपादन केल्यानंतर असा विषय सुचण्यास तब्बल २५ वर्षे वाट पाहावी लागली आणि हा विषय विकसित करताना अनुभवातूनच मी शिकत गेलो’, असे चिंतामणी हसबनीस यांनी सांगितले.
प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या दहा व्यक्तिरेखांचे चित्र मी त्यांना दाखविले होते. ते पाहून प्रभावळकर भारावले. या प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी स्वतंत्र आवाज वापरण्यात आला असल्याने त्या व्यक्तिरेखेची ओळख करून देणारी संहिता मी लिहून देतो असे सांगत त्यांनी संहिता लिहूनही दिली. हे चित्र पाहणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तीला ब्रेल लिपीमुळे ते चित्र वाचता येणार असून हेडफोन लावल्यानंतर प्रत्येक भूमिकेचा आवाज ऐकता येणार आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा परिचय नवरसांची नऊ चित्रे रेखाटून करून देण्यात आला आहे. पं. रविशंकर आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना त्यांना पुढे तारा जोडण्यात आल्या आहेत. हे चित्र पाहताना हात तारांना लागल्यावर दृष्टिहीन व्यक्तीला सतार आणि संतूर वाजल्याचीही प्रचिती येते, असे चिंतामणी हसबनीस यांनी सांगितले.
केवळ दृष्टी असलेल्याच नव्हे तर दृष्टिहीन व्यक्तींनाही स्पर्श आणि आवाजातून पाहता येतील अशी चित्रे चितारलेल्या हसबनीस यांचे चित्रप्रदर्शन सोमवारपासून (२५ जानेवारी) तीन दिवस कलारसिकांना अनुभवता येणार आहे. ‘क्लोज्ड आईज अँड ओपन माइंडस’ हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री साडेआठ या वेळात भरविण्यात येणार आहे. यामध्ये तैलरंगाचा वापर करून कॅनव्हासवर चितारलेल्या २२ व्यक्तिचित्रांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintamani hasabanis visually impaired persons enjoying picture
First published on: 23-01-2016 at 03:19 IST