पिंपरी महापालिकेच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादी ‘आमने-सामने’ येणे अपेक्षित असताना, भाजप-शिवसेनेतच कलगीतुरा रंगलेला आहे. नऊ महिन्यांपूर्वीच्या पालिका निवडणुकांचे संघर्षांचे वातावरण अद्याप निवळले नाही. भाजप-शिवसेनेत आगामी विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांची व्यूहरचना सुरू झाली आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी या तीनही विधानसभा आणि मावळ व शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर, त्या ठिकाणी आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शिवसेनेची लढाई आहे. यामुळेच निवडणुकांचे पडघम सुरू होण्यापूर्वीच भाजप आणि शिवसेनेमध्ये वर्चस्वाची कुरघोडी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनव्या वादाचे प्रकार सुरू आहेत. विशेषत भाजपचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि शिवसेनेचे शहरप्रमुख व पालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. भाजपविरोधी पत्रके काढली जातात म्हणून शिवसेनेच्या कार्यालयातीलं संगणक काढून नेण्याची अजब कारवाई महापालिकेने केली. ती करण्यास भाजपने भाग पाडले, हे उघड झाले. यावरून दोन्ही पक्षात पुन्हा तडका उडाला आहे. या प्रकरणी शिवसेनेने आगपाखड केल्यानंतर भाजपने सारवासारव केली. राहुल कलाटे सध्या आजारी असून ते महापालिकेत येत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत शिवसेना कार्यालयात गैरप्रकार होत असल्याची तक्रार करत कलाटे परत आल्यानंतर संगणक पूर्ववत बसवण्यात येईल, असा युक्तिवाद भाजपने केला आहे. तो शिवसेनेला पटला नाही. परिणामी, दोन्ही पक्षात आधीच कटुता असताना पुन्हा धुसफुस सुरू झाली आहे.

Sangli Lok Sabha, Sangli,
सांगलीत काँग्रेस आमदारांची झाली पंचाईत
odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
BJP test, Congress, West Nagpur,
काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात

पिंपरी महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. प्रत्यक्षात, भाजप-राष्ट्रवादीचे साटेलोटे असून त्यांच्यात अघोषित समझोता आहे. शिवसेना-भाजपचे मात्र सातत्याने खडाजंगी होत असल्याचे दिसून येते. हे सारे आताच सुरू झाले, असे नाही. बऱ्याच काळापासून त्यांच्यात कुरबुरी आहेत. फेब्रुवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा फिसकटली आणि दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. तेव्हा भाजपने शिवसेनेचा धुव्वा उडवला. महापालिकाजिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेनेला जेमतेम नऊ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने तीनवरून ७७ पर्यंत मजल मारली. महापालिका निवडणुकीत भाजप वरचढ ठरली असली, तरी विधानसभा आणि लोकसभेच्या मतांचे राजकारण वेगळे आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेची ताकद वेळोवेळी सिद्ध झालेली आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार सलग दोन वेळा निवडून गेले आहेत. विधानसभा निवडणुकीत िपपरीत शिवसेनेचा आमदार निवडून आला. तर, चिंचवड व भोसरी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. २००९ मध्ये मावळमधून गजानन बाबर आणि शिरूरमधून शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेचा भगवा फडकावला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बाबर यांच्याऐवजी उमेदवारी मिळालेले श्रीरंग बारणे मावळचे खासदार झाले. आढळराव यांनी शिरूरची खासदारकी कायम ठेवली. शिवसेनेचे खासदार असलेल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा डोळा आहे. आगामी निवडणुकीसाठी मावळमधून लक्ष्मण जगताप तर शिरूरमधून महेश लांडगे या आमदारद्वयींच्या संभाव्य उमेदवारीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेना-भाजप युती होईल की नाही, यावर विधानसभा-लोकसभेची सगळी गणिते अवलंबून राहणार आहेत. बारणे आणि जगताप यांच्यातून विस्तव जात नाही. त्यांच्यात टोकाचे वाद हे पक्षीय पातळीवरचे नसून वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. आढळराव आणि लांडगे यांच्यातही संघर्षांचे वातावरण आहे. काही काळापूर्वी, विलास लांडे यांच्याविरोधात आढळराव व लांडगे एकत्र होते. मात्र, शिरूरमध्ये समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाल्यापासून लांडगे आणि आढळराव यांच्यात शह-काटशहाचे राजकारण व श्रेयवाद सुरू झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप व राहुल कलाटे यांच्यात लढत झाली, तेव्हा जगताप विजयी झाले व कलाटे दुसऱ्या स्थानावर राहिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कलाटे यांनी पुन्हा शड्डू ठोकले आहेत. कलाटे यांच्यासमोर भाजपकडून कोण असेल, हे अद्याप स्पष्ट नसले तरी भाजपने त्यांचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. कलाटे यांना पोषक राहणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्या वाकड प्रभागाची रचना करण्यात आली होती. ते ज्या उमेदवारांना तिकीट देऊ  इच्छित होते, त्यांना भाजपने आपल्याकडे खेचून घेतले. ‘स्मार्ट सिटी’साठी ‘मॉडेल वॉर्ड’ म्हणून वाकड परिसराची निवड होणार होती. मात्र, ऐन वेळी पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर प्रभागांवर शिक्कामोर्तब झाले. ‘स्मार्ट सिटी’च्या संचालकपदासाठी पक्षीय बळानुसार शिवसेनेने कलाटे यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना, भाजपने कलाटे यांना डावलले आणि स्वतच्या सोयीप्रमाणे शिवसेनेच्याच मात्र भाजपच्या मार्गावर असलेल्या नगरसेवकाची वर्णी लावली. वाकड प्रभागातील रस्त्याचा विषय दप्तरी दाखल करण्याचा प्रस्ताव सभेपुढे आहे. या सर्व कारस्थानामागे भाजपचे नेते आहेत, असा कलाटे यांचा आरोप आहे. तर, भाजपला कलाटे यांचे आरोप मान्य नाहीत. अशा काही मुद्दय़ांवरून काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेतील धुसफुस वाढली असून हा संघर्ष वाढत जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

आयुक्तांची कोंडी

भाजप शिवसेनेच्या वादात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे सँडविच झाले आहे. अलीकडे आयुक्तांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आयुक्त हर्डीकर हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात. इतर पक्षांच्या नगरसेवकांची कामे करत नाहीत. भाजपला श्रेय मिळेल, अशीच कामे प्राधान्याने करतात, हा शिवसेनेसह इतर पक्षांचा आरोप आहे. तथापि, आयुक्त कोणतेही भाष्य करण्याचे टाळतात, असे बोलले जाते.