शाळा, महाविद्यालयांचा परिसर व उच्चभ्रू वस्त्यांमध्ये तरुण-तरुणींना मॅफ्रेडॉन (एमडी) हा अमली पदार्थ विकणाऱ्या अंतरराज्य टोळीतील दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी १७४ ग्रॅम वजनाचे पाच लाख २२ हजार रुपये किमतीचे मॅफ्रेडॉन जप्त केले आहे.
अब्दुलहमिद आयुब काझी (वय ३७), अब्दुलआहद फरीद अब्बासी (वय २४, दोघे रा. पेरी क्रॉस रस्ता, एसबीआय बँकेसमोर, बांद्रा वेस्ट, मुंबई) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्यातील कर्मचारी अतुल भिंगारदिवे व जाकीर पठाण यांना खबऱ्याकडून या आरोपींची माहिती मिळाली होती. वाडिया रुग्णालयाजवळ येथे हे दोघे अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे पोलिसांना कळाले होते. त्यानुसार बुधवारी या ठिकाणी सापळा लावून दोघांना पकडले.
आरोपींकडून प्रामुख्याने शाळा व महाविद्यालयांच्या परिसरामध्ये त्यांच्या हस्तकामार्फत तरुण-मुलामुलींना अमली पदार्थाची विक्री केली जात होती. उच्चभ्रू वस्त्यातील तरुणांनाही ते गाठत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. मॅफ्रेडॉन या अमली पदार्थासह त्याचे तंतोतंत वजन करण्यासाठी मोबाइल फोनसारखे दिसणारे दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटेही त्यांच्याकडे सापडले. या आरोपींचे आंतरराज्य रॅकेट असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हा अमली पदार्थ त्यांनी नेमका कोठून आणला, त्यांच्याकडे त्याचा आणखी साठा आहे का, मूळ सूत्रधार कोण आहेत. टोळीतील इतर साथीदार कोण आहेत, याबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक मुगळीकर, उपनिरीक्षक संजय गायकवाड, ज्ञानोबा निकम, कर्मचारी सर्फराज शेख, महेंद्र पवार, अतुल भिंगारदिवे, जाकीर पठाण, इम्रान नदाफ यांनी ही कारवाई केली.