पुणे : पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी ८ हजार ४१७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ३८ मतदान केंद्रे दुर्गम ठिकाणी असून, त्या ठिकाणी संप्रेषण सुविधा सक्रिय नाही. त्यामुळे जिल्ह्यात दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांनी दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर संप्रेषण सुविधा उपलब्ध करण्याची सूचना उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा दळणवळण आराखड्याच्या समन्वय अधिकारी शमा पवार यांनी केली.

दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याच्या प्रतिनिधींबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पवार बोलत होत्या. जिल्हा माहिती अधिकारी तथा जनसंपर्क व प्रसिद्धी कक्षाचे समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर उपस्थित होते.

हेही वाचा – महापौर ते… आमदार, खासदार!

श्रीमती पवार म्हणाल्या, की मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संप्रेषण सुविधा सक्रिय असणे आवश्यक आहे. दूरसंचार सेवा कंपन्यांनी दुर्गम भागातील ३८ मतदान केंद्रांपैकी किती ठिकाणी ‘मोबाइल नेटवर्क’ पोहोचते याची पडताळणी करावी. नेटवर्क उपलब्ध होत असल्यास कार्यालयास माहिती द्यावी. त्यानुसार सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना देऊन पर्यायी व्यवस्था करता येईल.

हेही वाचा – पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त

प्रचार मजकुराचे पूर्वप्रमाणीकरण आवश्यक

निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लघुसंदेश (बल्क एसएमएस) पाठवणे, ध्वनिमुद्रित केलेले श्राव्य संदेश, समाज माध्यमे, इंटरनेट संकेतस्थळावरून प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण, संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. पूर्वप्रमाणीकरण न केलेल्या मजकुराचे बल्क एसएमएस, श्राव्य संदेश दूरसंचार कंपन्यांनी न पाठवण्याबाबत डॉ. ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Story img Loader