लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाआघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी घड्याळ चिन्हाचे छायाचित्र त्यांच्या प्रचारपत्रकात वापरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. याबाबत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असून कार्यवाहीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पक्षाकडून प्रत पाठविण्यात आली आहे. धंगेकर यांच्या प्रचारपत्रकात महाआघाडीतील घटक पक्षांचे चिन्ह वापरण्यात आले आहे. त्यामध्ये घड्याळ या चिन्हाचाही वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा-बारामतीमध्ये कोण जिंकणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले उत्तर…

महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या प्रचार पत्रकांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करून मते मिळविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह छापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम निकालास अधीन राहून केवळ अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात आचारसंहितेचा भंग झाला असून संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही तक्रार दिली.