लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामतीच्या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप करणे, म्हणजे विरोधकांनी एकप्रकारे पराभवाची कबुलीच दिली आहे. बारामतीच्या मतदानानंतर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आढावा घेतला. त्यानुसार बारामतीची लढाई सुळे विरूद्ध पवार अशी होती आणि त्यात पवारच जिंकणार, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

आणखी वाचा-पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आमिष! म्हणाले, पोशाख करतो, अंगठी करतो…

पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत खासदार तटकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘सन २०१४ मध्ये विधानसभेचे निकाल हाती येण्यापूर्वीच भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा निर्णय सिल्वर ओक या ठिकाणी झाला. भाजपसोबत सत्तेत जाण्याचेही ठरले होते. मात्र, काही कारणांनी तसे होऊ शकले नाही. सन २०१६ मध्ये भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय झाला. मात्र, शिवसेना नको, असे सांगण्यात आले. त्यावर शिवसेना-भाजप युती अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केली असून शिवसेनेला बाहेर काढता येणार नाही. तुम्ही भाजप-शिवसेना युतीमध्ये सहभागी व्हा, त्यानंतर शिवसेनेने काही निर्णय घेतल्यास पाहू, असे तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे तेव्हाही सत्तेत जाण्याचे बारगळले. त्यानंतर पुन्हा सन २०१९ मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. भाजपसोबत जाण्याचा निर्णय आधी झाला, त्यानंतर आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चेला गेलो. आता आमचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून तो तसूभरही बदलणार नाही.’