विजेसंदर्भातील विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘महावितरण’ च्या वतीने मंगळवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये वीजग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे, असे ‘महावितरण’ कडून कळविण्यात आले आहे.
वीजग्राहकांच्या तक्रारी तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येत असते. ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींवर या उपक्रमात सुनावणी घेण्यात येते. पुणे परिमंडलातील रास्ता पेठ, पद्मावती, नगर रोड, पर्वती, बंडगार्डन, कोथरूड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर त्याचप्रमाणे मंचर, राजगुरुनगर आणि मुळशी या विभागीय कार्यालयांमध्ये मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत या उपक्रम राबविण्यात येणार आहे.
वीजबिल, नवीन वीजजोड आदींबरोबर विजेसंदर्भातील ग्राहकांच्या विविध तक्रारी या उपक्रमांतर्गत निकाली काढण्यात येणार आहेत. सर्व विभागीय कार्यालयांमध्ये दाखल झालेल्या वीजग्राहकांच्या तक्रारींवर संबंधित कार्यकारी अभियंता सुनावणी घेऊन त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करणार आहेत. परिमंडलातील वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण’ च्या वतीने करण्यात आले आहे.