पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संगणकशास्त्र या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून २ ते ५ ऑगस्ट या कालावधीतील परीक्षा १३ ते १९ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला. मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आणि विद्यापीठाची परीक्षा एकाच वेळी आल्याने विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला असून, या बदलामुळे एमसीए सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सीईटी सेलतर्फे एमसीएची सीईटी चार आणि पाच ऑगस्टला होणार आहे. तर, विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार संगणकशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाची परीक्षा २६ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत होणार होती. या परीक्षेतील कम्प्लायर कन्स्ट्रक्टर या विषयाची परीक्षा ५ ऑगस्टलाच होणार होती. त्यामुळे एमसीएची सीईटी देऊ इच्छिणारे तृतीय वर्षाचे विद्यार्थी एमसीएची सीईटी मुकण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून संगणकशास्त्र अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार २ ते ५ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या परीक्षा आता १३ ते १९ ऑगस्ट या कालावधीत घेतल्या जाणार असल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे एमसीए सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.